पुणे: राजकीय मतभेद असले तरी नातेसंबंध वेगळे असतात आणि ते जपणे महत्त्वाचे आहे. उद्धव ठाकरे बोलावतील तर मी नक्कीच भेटायला जाईन, असे मत शिवसेना (शिंदे गट) नेते व राज्याचे सामाजिक न्यायमंत्री संजय शिरसाट यांनी माध्यमांशी बोलताना व्यक्त केले. त्यांच्या या वक्तव्यामुळे राजकीय वर्तुळात चर्चेला उधाण आले आहे. ठाकरे कुटुंब एकत्र यावे, यासाठी आमच्या शुभेच्छा आहे, असेही त्यांनी यावेळी स्पष्ट केले. (Latest Pune News)
ज्येष्ठ नागरिकांच्या समस्या संबंधित खात्यांचे मंत्री आणि अधिकारी यांच्यासमोर मांडण्यासाठी शुक्रवारी बालगंधर्व रंगमंदिरात ज्येष्ठांचा राज्यस्तरीय महामेळावा पार पडला. या मेळाव्याला शिरसाट हे उपस्थित राहिले.
यावेळी ते माध्यमांशी बोलत होते. राज ठाकरे आणि देवेंद्र फडणवीस यांच्यात नुकतीच झालेली भेट व त्यावर झालेल्या चर्चांबद्दल विचारणा केली असता, अजित पवार आणि शरद पवार यांच्यातही भेटीगाठी होत असतात, असेही शिरसाट यांनी यावेळी स्पष्ट केले.