पुणे: महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या अध्यक्षपदी आयएएस अधिकाऱ्याची बदली करण्यात आल्यामुळे या बदलीविरोधात शिक्षण विभागातील सहसंचालकांनी न्यायालयात याचिका दाखल केली आहे. त्यामुळे न्यायालयाच्या सुनावणीनंतर आयएएस अधिकारी त्रिगुण कुलकर्णी हे बोर्डाचे अध्यक्ष म्हणून कायम राहणार की त्यांना पुन्हा स्वगृही जावे लागणार, हे पाहणे उत्सुकतेचे ठरणार आहे. याबाबतची सुनावणी येत्या 25 तारखेला आहे.
राज्य मंडळाच्या अध्यक्षपदी शिक्षण विभागातीलच अधिकाऱ्यांची नियुक्ती केली जात होती. परंतु, प्रथमच आयएएस अधिकारी राज्य मंडळाच्या अध्यक्षपदी विराजमान झाले. दोन दिवसांपूर्वी त्यांनी अध्यक्षपदाची सूत्रे हाती घेतली. शिक्षण विभागातील सहसंचालक दर्जाचे अधिकारी पदोन्नतीनंतर शिक्षण विभागातील संचालक व अध्यक्षपदाच्या रिक्त पदांवर नियुक्त केले जातात.
सध्या शिक्षण विभागात संचालक व अध्यक्षपदासाठी आवश्यक असलेली अनुभवाची पात्रता पूर्ण केलेले अधिकारी नाहीत. त्यामुळे या पदावर आयएएस दर्जाचे अधिकारी नियुक्त करण्यात आले आहेत. परंतु, अनुभवी सहसंचालक अध्यक्ष म्हणून नियुक्त करावा, अशी मागणी शिक्षण विभागातील अधिकारी दबक्या आवाजात करीत आहेत.
गेल्या काही वर्षांपासून शिक्षण विभागातील विविध विभागांच्या प्रमुखपदी आयएएस अधिकारी नियुक्त केले जात आहेत. शिक्षण आयुक्तपदी आयएस अधिकारी नियुक्त झाले. त्यानंतर महाराष्ट्र राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषदेच्या संचालकपदीसुद्धा आयएएस दर्जाचे अधिकारीच नियुक्त केले जात आहेत. परीक्षा परिषदेवरसुद्धा महसूल विभागातील अधिकारी कामकाज पाहत आहेत. मागील वर्षी पुणे विभागीय शिक्षण मंडळाच्या अध्यक्षपदी प्रतिनियुक्तीवर महसूल विभागातील अधिकाऱ्यांची नियुक्ती करण्यात आली होती. मॅटमध्ये त्याला आव्हान देण्यात आले होते, त्यावर या नियुक्तीला स्थगिती देण्यात आली होती.
शिक्षण विभागातील काही सहसंचालक दर्जाच्या अधिकाऱ्यांची दहा ते बारा वर्षे सेवा राहिलेली असताना त्यांना पदोन्नतीने संबंधित पद देणे गरजेचे आहे. त्यामुळे या पदांवर शिक्षण विभागातीलच अधिकाऱ्यांची नियुक्ती व्हावी. त्यांचे पदोन्नतीचे अधिकार डावलले जाऊ नयेत, या मागणीसाठी शिक्षण विभागातीलच काही अधिकाऱ्यांनी न्यायालयात याचिका दाखल करण्यात आल्याचे शिक्षण विभागातील अधिकाऱ्यांनी सांगितले. त्यामुळे न्यायालय याबाबत काय निर्णय घेणार, हे पाहणे उत्सुकतेचे ठरणार आहे.