पुणे: पुण्यातील बनावट नोटांच्या रॅकेटमध्ये हैदराबाद कनेक्शन पुढे आले आहे. हैदराबाद येथील अण्णा नावाच्या व्यक्तीने या नोटा पुण्यातील प्रभू गुगलजेड्डी आणि नरेश शेट्टी यांना दिल्याचे पोलिस तपासात समोर आले आहे.
एवढेच नाही, तर अण्णाची एक टीम देखील पुण्यात बनावट नोटांची छपाई करून देण्यासाठी आली होती. मात्र, काही कारणांनी आर्थिक व्यवहार फिसकटल्याने त्याने अर्ध्याच नोटांची छपाई करून हैदराबाद गाठले. या टोळीने बनावट नोटा पुण्यासह इतर शहरांत देखील चलनात फिरविल्याचा संशय असून, त्या अनुषंगाने पोलिसांनी तपास सुरू केला आहे. (Latest Pune News)
दरम्यान, शिवाजीनगर पोलिसांच्या सायबर पथकाने या रॅकेटचा पर्दाफाश केला असून, आत्तापर्यंत मनीषा (वय 35), भारती (वय 34), सचिन यमगर (वय 35, रा. गहुंजे), नरेश शेट्टी (वय 42, रा. लोहगाव) आणि प्रभू गुगलजेड्डी (वय 38, रा. चिंचवड) या पाच जणांना अटक केली आहे.
सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी शेट्टी हा गुगलजेड्डीचा दाजी आहे. शेट्टी पूर्वी ठेकेदारीचे काम करायचा. गुगलजेड्डी हा हैदराबाद येथील अण्णाच्या संपर्कात आला. त्यानेच तेथून बनावट नोटा सुरुवातीला पुण्यात आणून शेट्टीमार्फत बाजारात फिरविल्या. त्यासाठी त्याने मनीषा ठाणेकर आणि इतर आरोपींना हाताशी धरले.
अण्णाने या बनावट नोटाच शेट्टी आणि गुगलजेड्डीला छापून देण्याचे टेक्निक देतो असे सांगितले. त्यासाठी काही पैशात त्यांचा व्यवहार ठरला होता. ठरल्याप्रमाणे अण्णाने त्याची एक टीम शेट्टी याच्या पुण्यातील लोहगाव येथील घरी पाठवून दिली. तेथे त्यांनी नोटांची छपाई करण्यास सुरुवात केली. परंतु, अण्णासोबत ठरलेला व्यवहार पूर्ण न झाल्याने अर्ध्यावरच नोटा छापण्याचे त्यांनी सोडून दिले. हैदराबाद येथील अण्णा, शेट्टी आणि गुगलजेड्डी हे ऑनलाइन माध्यमातून एकमेकांच्या संपर्कात आले.
...म्हणून दोनशेच्याच नोटांची छपाई
पाचशे रुपयांच्या बनावट नोटांची बाजारात हेराफेरी करताना अनेकदा संशय येतो. समोरील व्यक्ती देखील पाचशे रुपयांची नोट हातात घेताना विचार करतो. त्यामुळे या टोळीने दोनशे रुपयांच्याच बनावट नोटा बाजारात फिरविण्याचा फंडा वापरला. दोनशे रुपयांच्या नोटेने खरेदी करताना किंवा सुट्टे घेताना कोणाला संशय येत नव्हता. प्रामुख्याने रात्रीच्या वेळी पेट्रोलपंप किंवा मार्केटमध्ये खरेदी करताना गर्दीच्या वेळी या नोटा टोळी चलनात आणत असल्याची माहिती आहे.
...असे आले होते रॅकेट उजेडात
शिवाजीनगर परिसरातील एका नामांकित बँकेत 17 एप्रिल रोजी 200 रुपयांच्या बनावट चलनी नोटा जमा झाल्या होत्या. व्यवस्थापकांनी या संदर्भात शिवाजीनगर पोलिस ठाण्यात तक्रार दिली. बँकेत कोणत्या खात्यात ही रक्कम भरली गेली, तिथून पोलिसांनी तपासाला सुरुवात केली. पोलिसांनी त्याला पकडले.
पुढे मनीषा ठाणेकरचे नाव आले. पोलिसांनी तिला ताब्यात घेतले. तिच्याकडून पोलिसांनी दोनशे रुपयांच्या शंभर बनावट नोटा जप्त केल्या. तिच्या चौकशीत आरोपी भारती गावंड हिचे नाव उघडकीस आले. तिच्याकडून दोनशे रुपयांच्या तीनशे नोटा मिळाल्या. त्यानंतर पोलिसांनी सचिन यमगर याला ताब्यात घेतले.
या तिघांनी कोल्हे नावाच्या व्यक्तीकडून या बनावट नोटा मिळवल्या असल्याचे स्पष्ट झाले. प्रत्यक्ष तपासात कोल्हे हे नाव आरोपी शेट्टी धारण करत असल्याचे निष्पन्न झाले. लोहगावमधील त्याच्या घरावर छापा टाकला.