खेड: भारताच्या स्वातंत्र्यसंग्रामात प्राणाची आहुती देणार्या आणि देशभक्तीचे धगधगते स्फुरण, प्रेरणा ठरलेल्या हुतात्मा शिवराम हरी राजगुरू यांची 117 वी जयंती रविवारी (दि. 24) साजरी होत आहे. मात्र, त्यांचे जन्मस्थळ असलेल्या राजगुरूवाड्याचे नियोजित राष्ट्रीय स्मारकाचे काम फक्त घोषणांमध्ये आणि कागदावरच अडकून पडले आहे.
राजगुरुनगर येथील थोर क्रांतिकारक हुतात्मा राजगुरू यांच्या जन्मस्थळवाड्याचे राष्ट्रीय स्मारकात रूपांतर झाले आहे. भीमा नदीकाठावर दर्शनी भागात असलेला हा ऐतिहासिक वाडा काही नव्याने झालेल्या कामाचा भाग वगळता सध्या जीर्णावस्थेत आहे. प्रवेशद्वारापासून अनेक भागांची स्थिती बघता राष्ट्रीय स्मारक आणि त्याचे रूपांतर सद्य:स्थितीला केवळ कागदोपत्रीच राहिले आहे. (Latest Pune News)
या स्मारकाच्या कामाचा शुभारंभ 12 सप्टेंबर 2024 रोजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या हस्ते झाला. या कामाचा राज्य सरकारने 254 कोटी रुपयांचा आराखडा बनवला आहे. त्यापैकी 104 कोटी रुपये मंजूर होऊन उपलब्ध झाले. मात्र, हुतात्मा राजगुरू जन्मस्थळवाड्याच्या नदीबाजूकडील संरक्षक भिंतीचेच काम संथगतीने आता सुरू आहे.
या कामासाठी वर्षापूर्वी बांधण्यात आलेला पहाड (लोखंडी व लाकडी मचाण) जशाचा तशा आहे. हुतात्मा राजगुरू जन्मस्थळ राष्ट्रीय स्मारकासाठी 8 हजार 35 स्क्वेअर मीटर जागा संपादित होणार आहे. पैकी सात गुंठे जागा शासनाच्या ताब्यात आहे.
स्मारकाच्या जागेतील काही खासगी कुटुंबांचे स्थलांतर करण्यात येणार आहे. त्यासाठी या जागेच्या संपादनाला प्राधान्य देण्यात आले. मात्र, बदल्यात योग्य जागा उपलब्ध करून दिली जात नसल्याचे सांगण्यात येत आहे.
46 मालमत्तांचे भूसंपादन
हुतात्मा राजगुरू जन्मस्थळ राष्ट्रीय स्मारकाचे आराखड्यात येणार्या तब्बल 46 मालमत्तांचे भूसंपादन होणार आहे. भूसंपादन करण्याला सुरुवात झाली असली, तरी अनेक कुटुंबांनी सहमती दिली नाही. 46 भूधारकांपैकी 13 जणांनी भूसंपादनाला संमतीपत्र दिले आहे. 7 मालमत्ताधारक मयत असल्याने त्यांच्या नातेवाइकांनी वारसनोंद केली नाही, तर काही मालमत्ताधारकांनी 25 लाख प्रतिगुंठा अशी मागणी केली आहे. तर, शासनाने 6 लाखरुपये गुंठा, असा दर दिला आहे. त्यामुळे भूसंपादनाचे काम रखडले आहे. तर, दुसरीकडे संपादन होत असल्याने येथील कुटुंबांना घरांची कोणतीही दुरुस्ती करता येत नाही.
भूसंपादन विषय शासनाने नगरपरिषदेकडे नुकताच दिला आहे. त्यादृष्टीने काम सुरू झाले आहे. संपादन संमतीसाठी संबंधित कुटुंबांना मुदतीची नोटीस दिली आहे. संमती मिळाली नाही, तर सक्तीचे भूसंपादन करावे लागेल. वारसांनी तत्काळ वारस नोंदी करून घेण्याबाबत सूचना दिल्या आहेत. पुढील कारवाई उपविभागीय अधिकारी यांच्या सूचनेनुसार केली जाईल.- अंबादास गर्कळ, मुख्याधिकारी, राजगुरुनगर नगरपरिषद
सक्तीचे भूसंपादन करण्यासाठी जिल्हाधिकारी पुणे यांच्याकडे प्रस्ताव सादर करण्यासाठी राजगुरुनगर नगरपरिषदेला आदेश दिले आहेत. भूसंपादनासाठी एकूण 11 कोटी 37 लाख 24 हजार 291 रुपये आवश्यक अनुदान तरतूद करण्यात आली आहे.- अनिल दौंडे, उपविभागीय अधिकारी, खेड