बारामती : पुढारी वृत्तसेवा : लैंगिकदृष्ट्या दुर्बल असलेल्या पतीने पत्नीला जबरदस्तीने इतर सात ते आठ जणांशी शारीरिक संबंध ठेवायला भाग पाडल्याची घृणास्पद घटना बारामतीत घडली. याप्रकरणी पोलिसांनी तिच्या पतीसह अन्य सहा जणांविरोधात गुन्हा दाखल केला आहे.
राहुल प्रमोद गावडे, अरबाज आझीम इनामदार, फैजल दिलावर इनामदार, गणेश ईश्वर अवघडे व इतर अनोळखींचा आरोपींमध्ये समावेश आहे. त्यांच्या विरोधात बलात्काराचा, तर फिर्यादीच्या पतीविरोधात तिला जबरदस्तीने हे कृत्य करायला भाग पाडल्याचा गुन्हा दाखल झाला आहे. यातील गावडे, अरबाज इनामदार व फैजल इनामदार व गणेश अवघडे यांना पोलिसांनी अटक केली आहे.
सन २०१७ ते जुलै २०२१ या कालावधीत ही घटना घडली. शहरानजीक फलटण रस्त्यावर ही फिर्यादी महिला राहते. तिचा पती लैंगिकदृष्ट्या दुर्बल आहे. तिने इतरांशी संबंध ठेवावेत, यासाठी पतीकडून दबाव टाकला जात होता. पीडितेच्या मोबाईलवरून तो मित्रांना मेसेज करून घरी बोलावून घ्यायचा. पत्नीने विरोध केल्यास तिला जिवे मारण्याची धमकी दिली जात होती, असे फिर्यादीत म्हटले आहे.
यासंबंधी पीडितेने ९ डिसेंबर रोजी पोलिस ठाण्यात फिर्य़ाद दाखल केली. संवेदनशील गुन्हा असतानाही पोलिसांनी माध्यमांपर्यंत या गुन्ह्याची माहिती पोहचू दिली नाही. अटक आरोपींना न्यायालयात नेल्यानंतर याची माहिती समजली. पोलिसांनी या घटनेबाबत कमालीची गुप्तता का बाळगली? याप्रकरणी कोणाला अभय देण्याचा तर प्रयत्न नव्हता ना? अशी चर्चा आता सुरू झाली आहे.