पुणे

उन्हात पाण्यासाठी वणवण : दुर्गम ठाणगावच्या ‘जलजीवन’चे काम अर्धवट

Laxman Dhenge

वेल्हे : पुढारी वृत्तसेवा : पानशेत धरण खोर्‍यातील शिरकोली (ता. राजगड) येथील दुर्गम ठाणगाव व हिरवे धनगर वस्तीतील लाखो रुपये खर्चाच्या जलजीवन योजनेचे काम अनेक महिन्यांपासून अर्धवट अवस्थेत आहे. त्यामुळे ठाणगाव व हिरवे वस्तीतील रहिवाशांना भीषण पाणीटंचाईला तोंड द्यावे लागत आहे. रणरणत्या उन्हात हंडाभर पाण्यासाठी येथील महिला, नागरिकांची वणवण सुरू आहे.
दरवर्षी उन्हाळ्यात भीषण पाणीटंचाईला तोंड द्यावे लागणार्‍या ठाणगाव व हिरवे वस्तीसाठी शासनाने 'जलजीवन मिशन' अंतर्गत नळ पाणीपुरवठा योजनेसाठी 48 लाख रुपये मंजूर केले आहेत.

गेल्या वर्षी उन्हाळ्यात ठेकेदाराने योजनेचे काम सुरू केले. हिरवे वस्तीत पाण्याची टाकी उभारण्यात आली आहे. मात्र, टाकीत पाणी सोडले नसल्याने ती कोरडी आहे. तर ठाणगाव येथील पाण्याच्या टाकीचे काम अद्यापही पूर्ण झालेले नाही. पानशेत धरण तीरावरील जुन्या विहिरीतून जलजीवन योजनेच्या जलवाहिन्या टाकण्यात आल्या आहेत. मात्र, ठाणगाव येथे पाण्याची टाकी उभारली नसल्याने गावात अद्यापही या योजनेचे थेंबभरही पाणी आले नाही.

प्रत्येक कुटुंबाला मिळते हंडाभर पाणी

ठाणगाव येथे 15 कुटुंबे आहेत. गावातील कुपनलिकेचे पाणी कमी झाले आहे. त्यामुळे रेशनिंग पध्दतीने प्रत्येक कुटुंबाला एक हंडा पाणी कसे-बसे मिळते. माणसे, जनावरांना पाण्यासाठी दूर अंतरावर धरण क्षेत्रात तसेच पाणी मिळेल तेथे भटकंती करावी लागत आहे. हिरवे धनगर वस्तीतही अशीच स्थिती आहे.

जलजीवन योजनेचे काम एक वर्षभरापासून अर्धवट आहे. मुख्य जलवाहिनीसह अंतर्गत जलवाहिन्याही टाकण्यात आल्या आहेत. मात्र ठाणगावची टाकी पूर्ण झाली नसल्याने रहिवाशांना पाणीटंचाईला तोंड द्यावे लागत आहे.

– अमोल पडवळ, सरपंच, शिरकोली.

शिरकोली येथील डांगे खिंड, हाडळमाच व घिसरमाच वस्ती तसेच अन्य वाड्या-वस्त्यांवर जलजीवन योजनेंतर्गत नळ पाणीपुरवठा योजना राबविण्यासाठी अनेकदा निवेदने दिली. मात्र, अद्यापही योजनेला मंजुरी मिळाली नाही.

– नामदेव पडवळ, विश्वस्त, शिरकाई देवस्थान.

सर्व पाणवठे कोरडे पडले आहेत. डोंगरकड्यात तसेच जवळपास पाणी नसल्याने दूर अंतरावरील धरणातून पाणी आणावे लागत आहे.

-धोडिंबा कोंडिबा हिरवे, ग्रामस्थ.

संबंधित ठेकेदाराला टाकी व इतर सर्व कामे पूर्ण करून तातडीने जलजीवन योजना सुरू करण्याच्या सूचना देण्यात येणार आहेत.

-अमित अढे, उपविभागीय अभियंता, जि. प. पाणीपुरवठा विभाग.

हेही वाचा

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT