आशिष देशमुख
पुणे: वाढते तापमान आणि त्यासोबत वाढणारी वातावरणातील आर्द्रता यामुळे भारतातील कामगारांच्या कार्यक्षमतेवर गंभीर परिणाम होण्याचा धोका निर्माण झाला आहे. दमट उष्णतेमुळे होणाऱ्या संभाव्य कामाच्या तासांच्या नुकसानीने आता निर्णायक वळण अर्थात ‘टिपिंग पॉईंट’ गाठल्याचे भारतीय उष्णकटिबंधीय हवामानशास्त्र संस्था (आयआटीएम, पुणे) येथील शास्त्रज्ञांच्या नव्या अभ्यासातून समोर आले आहे. हा अभ्यास ‘जर्नल ऑफ जिओफिजिकल रिसर्च : ॲटमॉसफिअर’ या संशोधन पत्रिकेत प्रकाशित झाला आहे.
शास्त्रज्ञांनी केलेल्या अभ्यासानुसार १९८०च्या दशकाच्या मध्यापासून जागतिक पातळीवर तीव्र दमट उष्णतेमुळे होणारे संभाव्य उत्पादकता नुकसान झपाट्याने वाढले आहे. या वाढीत भारताचा वाटा निम्म्याहून अधिक आहे. त्यामुळे उष्ण होत जाणाऱ्या जगात भारत हा दमट उष्णतेच्या परिणामांचा प्रमुख जागतिक केंद्रबिंदू बनत आहे.
पुण्यातील इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ ट्रॉपिकल मेट्रोलॉजी येथील वरिष्ठ शास्त्रज्ञ डॉ. एस. के. साहा आणि डॉ. बी. एन. गोस्वामी यांनी हा विचार मांडला आहे. या अभ्यासात पोटेन्शिअल ऑक्युपेशनल प्रोडक्टिव्हिटी (पीओपीएल) ही संकल्पना वापरण्यात आली आहे.
संशोधनातील महत्त्वाचे निष्कर्ष...
धोकादायक दमट उष्णतेमुळे गमावले जाणारे कामाचे तास आणि त्या भागातील कार्यरत लोकसंख्या यांचा एकत्रित परिणाम म्हणजे संभाव्य उत्पादकता नुकसान.
तापमानाबरोबर आर्द्रता वाढल्यास घामाचे बाष्पीभवन कमी होते. परिणामी, शरीराचे तापमान नियंत्रित करण्याची क्षमता घटते, थकवा, निर्जलीकरण वाढते आणि कामाचा वेग कमी होतो.
अभ्यासात ३३ अंश सेल्सिअस आणि ४५ पेक्षा जास्त असलेल्या परिस्थितींचा विशेष विचार केला आहे.
भारतात उष्णता आणि आर्द्रतेचा हा संयुक्त ताण गेल्या काही दशकांत वेगाने वाढला आहे.
शेती, बांधकाम, मासेमारी, वाहतूक, पर्यटन आणि इतर मैदानी कामांमध्ये याचा सर्वाधिक फटका बसतो आहे.