पुणे : विनय पुराणिक
पिण्याच्या पाण्याची गुणवत्ता खराब होण्यास मानवी हस्तक्षेप जबाबदार असल्याचा निष्कर्ष गुणवत्ता विभागाकडून काढण्यात आला आहे. याला प्रशासनातील अधिकाऱ्यांनीही दुजोरा दिला असून, या समस्येवर वेळीच उपाययोजना केल्या नाहीत, तर कालांतराने मानवी आरोग्यासंदर्भात गंभीर समस्या उद्भवू शकतात, असा इशारा जल तज्ज्ञांकडून देण्यात आला आहे.
नांदेड, नागपूर, हिंगोली, परभणी, सोलापूर व छत्रपती संभाजीनगरमधील दूषित पाण्यांचे नमुने केवळ तेवढ्या कार्यक्षेत्रापुरते मर्यादित नाहीत. पाणथळांमधून अर्थात प्रवाही नदी, ओढे, विहिरी, कालव्यांच्या नजीकच्या परिसरात घनकचरा, परिसरातील मैला आणि सांडपाणी यांमुळे सर्वाधिक पाणी प्रदूषित होत असल्याचे गुणवत्ता विभागातील वैज्ञानिकांकडून स्पष्ट करण्यात आले.
तसेच पाणथळ शेजारील शेती ही आपसुकच बागायती असल्याने सर्वाधिक उत्पादनासाठी जास्तीत जास्त रासानिक खते, कीटकनाशकांचा वापर हा पाण्यासाठी अपायकारक ठरत आहे. त्याचबरोबर अपेक्षेपेक्षा जास्त भूजल उपसा होत असल्याने पाणी प्रदूषित होत असल्याचे वैज्ञानिक सांगतात.
कीटकनाशकांचे अवशेष भूजलात झिरपत असून विहिरी आणि कुपनलिकांच्या परिसरात स्वच्छतेकडे दुर्लक्ष केले जात आहे. अनेक जिल्हा परिषदांच्या कार्यक्षेत्रातील ग्रामपंचायतींमध्ये जलशुद्धीकरण प्रकल्प (एसटीपी) यंत्रणा कार्यान्वित होत नसल्याने नद्यांमध्ये बिनदिक्कत मैलापाणी सोडल्याचे सांगताना याचा आरोग्यावर सर्वाधिक गंभीर परिणाम होत असल्याचेही विभागातील सूत्रांनी नमूद केले.
उपाययोजना काय ?
पाणथळांभोवती स्वच्छता, घनकचरा व्यवस्थापन आणि प्रतिबंध
शेतपिकांसाठी रासायनिक खतांच्या बेसुमावर वापरावर नियंत्रण
स्रोतांची वेळोवेळ स्वच्छता, निर्जंतुकीकरण
नियमित पाण्याची तपासणी आणि जनजागृती
नद्यांमध्ये सोडण्यात येणारे मैलापाणी, औद्योगिक पाणी यामुळे जलप्रदूषण होत आहे. भूगर्भातील पाण्याचा बेसुमार उपसा असून, त्यावर नियंत्रण ठेवणे अत्यंत गरजेचे आहे. केवळ दूषित पाण्यामुळे लहान मुलांपासून ज्येष्ठांपर्यंत आरोग्याचे गंभीर परिणाम उद्भवत आहेत.सुनील जोशी जलतज्ज्ञ
पाण्यात नायट्रेटच्या घटकाचे प्रमाण मर्यादेपेक्षा वाढल्यास लहान मुलांच्या वाढीपासून ते मोठ्या व्यक्तींना हाडाच्या तसेच इतर समस्या उद्भवणे, वारंवार थकवा असे गंभीर आजार जडतात. अतिसार, पोटाचे-आतड्यांचे विकार, उलट्या असे जलजन्य आजार जडतात.डॉ. मनोहर धोम उपसंचालक, राज्य आरोग्य प्रयोगशाळा