Copy Pudhari
पुणे

HSC Exam Mass Copying: बारावीच्या पहिल्याच दिवशी मास कॉपी; छत्रपती संभाजीनगरमध्ये 24 अधिकाऱ्यांवर गुन्हा

सीसीटीव्हीत कैद गैरप्रकार; कॉपीमुक्त अभियानावर प्रश्नचिन्ह

पुढारी वृत्तसेवा

पुणे: महाराष्ट्र राज्य माध्यमिक उच्च माध्यमिक शिक्षण मंडळातर्फे घेण्यात येत असलेल्या इयत्ता बारावीच्या परीक्षेच्या पहिल्याच दिवशी छत्रपती संभाजीनगरमध्ये मास कॉपीचा प्रकार घडल्याची धक्कादायक माहिती उघडकीस आली आहे. त्यामुळे कॉपीमुक्त अभियानाचे अक्षरशः वाभाडे निघाले असून, याप्रकरणी तेथील गटशिक्षणाधिकाऱ्यांनी केंद्रचालक, पर्यवेक्षकासह तब्बल 24 अधिकाऱ्यांवर फौजदारी गुन्हा दाखल केला आहे.

राज्य मंडळाने प्रसिद्ध केलेल्या माहितीनुसार, इंग््राजीच्या पहिल्या पेपरला 42 गैरप्रकार घडल्याची माहिती प्रसिद्ध करण्यात आली. परंतु, छत्रपती संभाजीनगर विभागात कन्नड तालुक्यातील जैतापूर येथील राष्ट्रीय उच्च माध्यमिक विद्यालयात मास कॉपी झाल्याचे समोर आले.

सीसीटीव्ही कॅमेऱ्याचा धाक दाखवून परीक्षा पारदर्शक पद्धतीने घेतली जाईल, असा दावा केला जात होता. परंतु, याच सीसीटीव्ही कॅमेऱ्यात सर्व प्रकार कैद झाला आहे. विद्यार्थी एकमेकांशी बोलताना तसेच पेपरची अदलाबदल करताना दिसून आले. पर्यवेक्षकांच्या उपस्थितीत मास कॉपी होत असल्याचे सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाले.

या प्रकरणाची गंभीर दखल घेत जिल्हाधिकारी दिलीप स्वामी यांनी केवळ विद्यार्थ्यांवर कारवाई न करता या प्रकरणाला खतपाणी घालणाऱ्या यंत्रणेतील संबंधितांवरही कारवाई करण्याचा निर्णय घेतला. कर्तव्यात कसूर केल्याचा ठपका ठेवत केंद्र संचालकासह 24 पर्यवेक्षकांवर कारवाई केली आहे. परीक्षा केंद्रावरील सर्व जुन्या कर्मचाऱ्यांची दुसऱ्या ठिकाणी बदली केली असून, त्या ठिकाणी जिल्हा प्रशासनाकडून नवीन कर्मचारी नियुक्त केले आहेत. तसेच या प्रकरणात दोषी आढळणाऱ्या कर्मचाऱ्यांची विभागीय चौकशी केली जाणार आहे.

कॉपीमुक्त अभियान कागदावरच

राज्यातील तीन हजाराहून अधिक परीक्षा केंद्रांपैकी केवळ 172 परीक्षा केंद्रांवर सीसीटीव्ही कॅमेरे उपलब्ध नाहीत. त्यामुळे राज्यातील बहुतांश परीक्षा केंद्रावर सीसीटीव्ही कॅमेरे बसवलेले असताना सुद्धा मास कॉफी सारख्या घटना घडत असतील तर कॉपीमुक्त अभियान कागदावरच राहिले का असा प्रश्न उपस्थित करण्यात आला आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT