पुणे

पुणे : नर्‍हे, धायरीतील प्रश्नांकडे पालिकेचे दुर्लक्ष; कचरा आणि पाण्याची समस्या गंभीर

अमृता चौगुले

पुणे : पुढारी वृत्तसेवा

महापालिका हद्दीत नव्याने समावेश झालेल्या नर्‍हे आणि धायरी गावातील विविध नागरी प्रश्न ऐरणीवर आले आहेत. गावांमधील कचर्‍यासह पाण्याचा प्रश्न गंभीर झाला असून, महापालिका प्रशासनाचे या प्रश्नांकडे दुर्लक्ष होत असल्याचा आरोप नागरिकांकडून केला जात आहे. महापालिका हद्दीत समावेश झालेल्या नर्‍हे आणि धायरी गावांमधील नागरिकांना विविध समस्यांना तोंड द्यावे लागत आहे.

ग्रामपंचायत अस्तित्वात असताना पाणी आणि कचर्‍याबाबत जी यंत्रणा सक्षमपणे काम करीत होती, ती आता खिळखिळी झाल्याचे चित्र आहे. पूर्वी दररोज मोफत कचरा संकलित केला जात होता. मात्र, आता महिन्याला पैसे दिल्याशिवाय कचरा स्वीकारला जात नाही. त्यामुळे नागरिक रस्त्याच्या कडेला आणि मोकळ्या जागांमध्ये कचरा फेकून देतात. त्यामुळे दोन्ही गावांमध्ये जागोजागी कचर्‍याचे साम्राज्य दिसते.

महापालिकेच्या वतीने समाविष्ट गावांसाठी पाण्याचे टँकर पुरविले जातात, असे अधिकार्‍यांकडून वारंवार सांगितले जाते. मात्र, नर्‍हे आणि धायरी गावांमध्ये महापालिकेचे टँकरच दिसत नाहीत. जे टँकर दिसतात, ते सर्व खासगी स्वरूपाचेच असतात. महापालिकेने गावात एकही नवीन रस्ता केलेला नाही. दुसरीकडे अस्तित्वात असलेल्या रस्त्यावरील खड्डेसुद्धा बुजविले नाहीत. या सर्व कारणांमुळे महापालिकेपेक्षा ग्रामपंचायतच बरी, असे म्हणण्याची वेळ नागरिकांवर आली आहे.

समस्या सोडविण्यासाठी बेमुदत उपोषण

नर्‍हे, धायरी ही गावे पालिका हद्दीत समाविष्ट झाली आहेत. मात्र, येथील स्थानिक नागरिकांना मूलभूत सेवा- सुविधांसाठी झगडावे लागत आहे. नागरिकांचे प्रश्न सोडविण्यासाठी वारंवार आंदोलने केली, अधिकार्‍यांना निवेदने दिली. मात्र, परिस्थिती जैसे थे असल्याने राष्ट्रवादीचे शहर सरचिटणीस भूपेंद्र मोरे यांनी नर्‍हे रस्त्यावर शाहू बँकेजवळ कार्यकर्त्यांसह बेमुदत उपोष सुरू केले आहे. महापालिका आयुक्तांनी प्रश्न सोडविण्याचे लेखी आश्वासन दिल्याशिवाय उपोषण सोडणार नाही, असा इशारा मोरे यांनी दै. 'पुढारी'शी बोलताना दिला.

हेही वाचा

SCROLL FOR NEXT