पुणे

किती दिवस ड्रेनेजच्या पाण्यात जगायचं? : अप्पर परिसरातील नागरिकांचा सवाल

Laxman Dhenge

बिबवेवाडी : पुढारी वृत्तसेवा : बिबवेवाडी येथील अप्पर परिसरातील सरगम चाळीत गेल्या अनेक दिवसांपासून ड्रेनेजलाइन तुंबल्याने सांडपाणी रस्त्यावरून वाहत आहे. दुर्गंधीयुक्त पाणी घरांच्या दरवाजापर्यंत पोहोचल्याने नागरिकांचे आरोग्य धोक्यात आले आहे. या समस्येकडे महापालिका प्रशासनाचे दुर्लक्ष होत असल्याने आणखी किती दिवस ड्रेनेजच्या पाण्यात जगायचे? असा सवाल परिसरातील
रहिवाशांनी केला आहे.

गेल्या आठवड्यापासून पासलकर चौक ते सगम चाळीपर्यंत ड्रेनेजलाइनच्या दुरुस्तीचे काम सुरू आहे. यामुळे प्रवाह बंद झाल्याने झोपडपट्ट्यांमधून व चाळीतून येणारे सांडपाणी घरांच्या दरवाजापर्यंत पोहोचल्याने रहिवाशांची तारांबळ उडाली आहे. गेल्या आठ दिवसांपासून सकाळच्या वेळी परिसरात सांडपाणी साचत आहे. ड्रेनेज विभागाच्या अधिकार्‍यांना याबाबत माहिती देऊन उपाययोजना केल्या जात नसल्याचे नागरिकांनी सांगितले. यामुळे ड्रेनेजच्या पाण्यातून नागरिकांना ये-जा करावी लागत आहे.
महापालिका प्रशासनाने ही समस्या सोडविण्यासाठी तातडीने उपाययोजना करण्याची मागणी होत आहे. याबाबत ड्रेनेज विभागाच्या अधिकार्‍यांशी संपर्क साधला असता त्यांनी प्रतिसाद दिला नाही.

गेल्या पंधरा दिवसांपासून सरगम चाळीच्या प्रवेशद्वाराजवळील रस्त्यावरून ड्रेनेजचे पाणी वाहत आहे. सकाळच्या वेळी या पाण्याचा प्रवाह जास्त असल्याने परिसरात दिवसभर ते साचून राहत आहे. दुर्गंधीमुळे नागरिक त्रस्त झाले असून, त्यांचे आरोग्य धोक्यात आले आहे.

-आयुब शेख, रहिवासी

महापालिका प्रशासनाने नागरिकांच्या आरोग्याचा विचार करून तातडीने ही समस्या सोडवावी; अन्यथा तीव— आंदोलन करण्यात येईल.

– संजय वाघमारे, सामाजिक कार्यकर्ते

हेही वाचा

SCROLL FOR NEXT