Security Issues in Housing Societies
पुणे: गेल्या काही दिवसांपासून शहरात सोसायट्यांच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. चोर्या, घरफोड्या, केअरटेकरकडूनच ज्येष्ठ नागरिकांची लूट, अशा घटना वाढीस लागल्या आहेत. तर दुसरीकडे सुरक्षा रक्षकांकडून देखील घरफोड्या केल्या गेल्याचे प्रकार समोर आले आहेत.
शहरांमधील सहकारी गृहनिर्माण संस्थांमध्ये 24 तास सुरक्षा व्यवस्था ही एक अनिवार्य बाब बनली आहे. सद्यःपरिस्थितीत थोड्याफार फरकाने या गृहनिर्माण संस्थांमधील सुरक्षारक्षक हे अभावानेच सुरक्षाकार्याचे प्रशिक्षण घेतलेले वा सुरक्षेच्या कामासाठी शारीरिकद़ृष्ट्या सक्षम आढळतात. (Latest Pune News)
अपुरे काम आणि अपर्याप्त देखरेखीमुळे कामाच्या वेळात सुरक्षारक्षकांकडून दुर्लक्ष करण्याचे प्रकार खूपदा घडतात. त्याचप्रमाणे, मोबाइल फोनचा सतत आणि अनावश्यक वापर, वेळी-अवेळी चहा, खाण्यापिण्याच्या निमित्ताने जागा सोडून निघून जाणे, मित्रांबरोबर वा जवळपासच्या सुरक्षारक्षकांबरोबर जागेवर वा जागा सोडून गप्पा, कामाच्या वेळात सभासद वा इतरांची खासगी कामे करणे आणि त्याशिवाय वारंवार तंबी देऊनसुद्धा कामावर असताना झोपणे असे प्रकार सुरक्षारक्षकांकडून वारंवार घडत असल्याचे निदर्शनास येते. या आणि अशा निष्काळजी सुरक्षा व्यवस्थेवर
वेळीच उपाययोजना न केल्यास सुरक्षारक्षकांची नेमणूक ही निव्वळ औपचारिकता ठरते. अशा अकार्यक्षम सुरक्षाव्यवस्थेमुळेच अनधिकृत व्यक्ती गृहसंस्थेच्या आवारात येतात, चोरांचे फावते, वाहनांची नासधूस, जाळपोळ यासारखे प्रकार होऊन संस्थेमधील रहिवाशांना, विशेषत: जेष्ठ नागरिकांना असुरक्षित वाटते. तसेच, सभासदांना त्यांच्या पैशाचा योग्य विनियोग होत नसल्याची भावना निर्माण होते. सुरक्षाव्यवस्थेतील त्रुटींमुळे पोलिस यंत्रणेवरचा वाढता ताणही कमी होत नाही.
दिवसेंदिवस शहराचा विस्तार होतो आहे. त्याबरोबर नागरिकांच्या सुरक्षेचा प्रश्न वाढतो आहे. व्यवसायिक आस्थापनापासून ते गृहसंकुलापर्यंत नागरिकांकडून खासगी सुरक्षा रक्षकांची नेमणूक सुरक्षिततेच्यता दृष्टीकोणातून केली जाते. मात्र ही सेवा देणार्या सुरक्षा एजन्सीजकडून खरोखरोच निर्धारीत नियमांचे पालन केले जाते का हाही मोठा सवाल आहे. गेल्या काही दिवसात शहरात घडलेल्या घटना पाहात सोसायट्यातील सुरक्षा व्यवस्था कुचकामी असल्याचे अनेकदा समोर आले आहे.
सोसायट्यांकडून सुरक्षा एजन्सीजकडे कमी दरात सुरक्षा रक्षक पुरविण्याची मागणी केली जाते. तेथूनच नियमांना फाटा देत सेवा देणारी व्यक्ती सर्व नियम धाब्यावर बसवते. मग सेवा घेणारी व्यक्ती नियमानुसार गार्डची चौकशी देखील करत नाही किंवा कागदपत्राची मागणी सुद्धा करत नाही. गार्डच्या (सुरक्षा रक्षक) बाबतीत जर एखादा गंभीर गुन्हा घडला तर त्यामध्ये नाहक पोलिसांची दमछाक होते.
कमी दरात सेवा देण्याच्या स्पर्धेतून अनेक एजन्सजी निर्धारीत केलेल्या नियमांना फाटा देतात. परप्रांतिय सुरक्षा रक्षकांचा भरणा केला जातो. कमीत कमी सुट्ट्यांची मागणी, उपलब्धतेसाठी वेळेची मर्यादा नाही, जेवण- निवास कामाच्या ठिकाणी. शिवाय इतर गार्डच्या तुलनेत ते पगारात देखील काम करतात. अशा वेगवेगळ्या कारणामुळे सुरक्षा रक्षक कंपन्यांकडून बाहेरच्या राज्यातील कामगारांना प्राधान्य दिले जाते.
त्यातूनच त्यांची स्थानिक पातळीवर चारित्र पडताळणी केली जात नाही. यातील काही सुरक्षारक्षक त्यांच्या राज्यात गंभीर गुन्हे करून पुण्यात आलेले असतात. पोलिसांच्या तपासात असे अनेक प्रकार उजेडात आले आहेत. अनेकदा मालकाकडून दिला जणारा कमी पगार, कामाचे जास्त तास, त्यामुळे काही सुरक्षा रक्षक गुन्हेगारी कृत्याकडे आकर्षीत होतात. त्यातूनच घरफोडी, चोरी असे प्रकार शहरात घडल्याची अनेक उदाहरणे आहेत.
सुरक्षारक्षकांच्या कामाची वेळ 12 तासांहून जास्त नसावी; तसेच करारात उल्लेख नसल्यास त्याच्या निवार्याची कोणतीही प्रत्यक्ष वा अप्रत्यक्ष जबाबदारी गृहनिर्माण संस्थेची कदापि नसावी. परप्रांतियांबाबत ही शक्यता जास्त असते, जे दिवसभरात दोन जागी नोकरी करतात.
सुरक्षारक्षक संस्थेवर सर्व सुरक्षारक्षकांची पॅन व आधार कार्ड व पोलिस व्हेरीफिकेशन रिपोर्ट नेमणुकीपूर्वी देणे बंधनकारक करावे व सुरक्षारक्षक ठरावीक कालांतराने बदलत राहावे. गृहनिर्माण संस्थेच्या आवारात येणार्या प्रत्येक अरहिवासी व्यक्ती व वाहनाची नोंद करणे हे सुरक्षारक्षकाचे सर्वांत महत्त्वाचे काम असल्याने वॉचमन केबिन व बूम बॅरियर अत्यावश्यक आहे. त्याशिवाय संस्थेत सीसीटीव्ही बसवले असल्यास सुरक्षारक्षकाच्या हालचालीही त्यात दिसाव्यात.
सोसायटीमध्ये अतिउच्च दर्जाचे सीसीटीव्ही कॅमेरे बसविण्यात आले आहेत, याखेरीज सोसायटीत सभासदांव्यतिरिक्त येणार्या प्रत्येक व्यक्तीचे नाव नोंदणीवहीत सुरक्षारक्षकामार्फत नोंदविल्यानंतर संबंधित व्यक्तीला सोसायटीत प्रवेश दिला जातो. याखेरीज, माय गेट अॅपद्वारे घरमालकाला संदेश पाठवून त्याच्या परवानगीशिवाय त्या व्यक्तीला सोडले जात नाही. तसेच, घरातील प्रत्येक व्यक्तीचे बायोमेट्रिक व फोटो घेतले असून तिथे जाऊन घरातील प्रत्येक व्यक्तीने येताना बायोमेट्रिक करणे आवश्यक असते.- मोनिका गावडे- खलाने, सभासद, सुरभी क्लासिक सोसायटी, शनिवार पेठ
सोसायटीत सुरक्षेच्या द़ृष्टीने सुरक्षारक्षक तसेच सीसीटीव्हीची यंत्रणा कार्यान्वित आहे. डिलिव्हरी बॉयला घरात पार्सल नेऊन देण्यास बंदी आहे. त्यासाठी संबंधित पार्सल त्याला सुरक्षारक्षकाकडे जमा करण्याचा नियम करण्यात आला आहे. यामध्ये, औषधे, अन्नधान्य, गॅस आदी घरपोच सुविधाला सूट देण्यात आली आहे. याखेरीज, सोसायटीत सभासदांव्यतिरिक्त येणार्या प्रत्येक व्यक्तीचे नाव नोंदणीवहीत सुरक्षारक्षकामार्फत नोंदविल्यानंतर संबंधित व्यक्तीला सोसायटीत प्रवेश दिला जातो.- अरविंद मोरे, अध्यक्ष, सिल्वर ओक सोसायटी, कात्रज- कोंढवा रोड.