खेड: लाडक्या बहिणींसाठी योजना आणि छोट्या-मोठ्या नेत्यांना विकत घेऊन तसेच गुंडांना हाताशी धरून महायुतीने सत्ता मिळवली आहे. सत्ता आल्यानंतर राज्यातील मूलभूत प्रश्नांकडे दुर्लक्ष केले जात आहे, अशी टीका कर्जत जामखेडचे आमदार रोहित पवार यांनी राजगुरुनगर येथे महायुतीच्या सरकारवर केली.
आमदार रोहित पवार हे एका परिवाराला भेट देण्यासाठी राजगुरुनगर येथे आले होते. या वेळी त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला. अॅड. गणेश सांडभोर व अॅड. बी. एम. सांडभोर यांनी आमदार पवार यांचे स्वागत केले. (Latest Pune News)
या वेळी आमदार पवार म्हणाले, पाणी, वीज, आरोग्य, रस्ते या प्रश्नांकडे सरकार लक्ष देत नाही. नोकर्यांसाठी कोणी आंदोलन करीत नाही. लाडक्या बहिणींना पैसे मिळत नाहीत, त्यासाठीही कोणी आंदोलन करीत नाहीत. राज्यातील जनतेचा जीवन मरणाचा प्रश्न असताना त्याकडे सरकारचे लक्ष नाही. मात्र, मुद्दामहून हिंदू-मुस्लिम वाद निर्माण करून त्याकडे लक्ष वेधले जात आहे.
आ. पवार पुढे म्हणाले, महिलांवर होणार्या अत्याचारात महाराष्ट्र राज्य आघाडीवर गेले आहे. पुणे जिल्ह्यात दररोज 20 मुली, महिला बेपत्ता होत आहेत. केवळ पुणे शहरात वर्षभरात 650 महिलांवर बलात्कार आणि 850 विनयभंगाच्या तक्रारी झाल्या आहेत. ग्रामीण आणि राज्यात त्याचे प्रमाण अधिक आहे. महाराष्ट्राचा बिहार होतो आहे, असे आ. पवार म्हणाले.
उद्धव-राज आणि शरद पवार-अजित पवार एकत्र येतील
उद्धव ठाकरे-राज ठाकरे एकत्र येत असतील, तर त्यांचे स्वागत केले पाहिजे. त्यावर समाज काय करतो किंवा करेल, हा त्यांचा प्रश्न आहे. परंतु, पवार परिवार म्हणून आम्ही एक आहोत. राजकीयदृष्ट्या आम्ही वेगळे आहोत. एकत्र यायचे का नाही, ते शरद पवार, सुप्रिया सुळे आणि अजित पवार हे तिघे ठरवतील, असेही आमदार रोहित पवार यांनी सांगितले.