किल्ले शिवनेरी येथे मधमाश्यांचा हल्ला; पाच जण  File Photo
पुणे

Shivneri Fort Honeybee Attack: किल्ले शिवनेरी येथे मधमाश्यांचा हल्ला; पाच जण जखमी

लातूरच्या शेतकर्‍यांचा जखमींमध्ये समावेश

पुढारी वृत्तसेवा

जुन्नर: किल्ले शिवनेरी गडावरील श्री शिवाईदेवी मंदिराजवळ मधमाश्यांनी केलेल्या हल्ल्यात 5 ते 6 जण जखमी झाल्याची माहिती वनपरिक्षेत्र अधिकारी प्रदीप चव्हाण यांनी दिली. ही घटना बुधवारी (दि. 30) सकाळी 8 च्या दरम्यान घडली. 19 फेब्रुवारी रोजी साजरी झालेल्या शिवजयंती उत्सवापासून मधमाश्यांच्या हल्ल्याची ही पाचवी घटना आहे.

जुन्नरच्या शिवाईदेवी यात्रेच्या औचित्याने किल्ले शिवनेरीवर शिवाईदेवीच्या अभिषेकाचा सोहळा सुरू असताना, अचानक शिवाईदेवी मंदिराबाहेरील गडावर जाणार्‍या मार्गावर लातूर येथून आलेल्या 15 ते 20 शेतकर्‍यांवर मधमाश्यांनी हल्ला चढवला. (Latest Pune News)

हे शेतकरी स्वतःचा बचाव करण्यासाठी गळ्यातील उपरण्यांनी मधमाश्यांना झटकत, शिवाईदेवी मंदिराजवळील लेण्यांच्या दिशेने पळत सुटले. त्या वेळी तिथे उपस्थित स्थानिक पत्रकार धर्मेंद्र कोरे व त्यांच्या पत्नी प्रा. मनीषा कोरे यांनी त्यांना पळू नका, हालचाल करू नका, उपरणी झटकू नका, असे सांगत शांत राहण्यास सांगितले. मात्र, ते न ऐकता हे लोक पळतच राहिले. परंतु पुढे रस्ता बंद असल्याने ते शेतकरी पुन्हा माघारी फिरून पळू लागले. त्या वेळी तेथे बसलेल्या पत्रकार कोरे यांना मधमाश्यांनी लक्ष्य केले.

दरम्यान, शिवाईदेवी मंदिराचे पुजारी सोपान दुराफे यांनी कोरे यांना शरीर झाकण्यासाठी चादर दिल्याने मधमाशा हळूहळू तेथून दूर गेल्या. मंदिराबाहेर मधमाश्यांच्या झुंडी गुंजारव करत फिरत होत्या. काही माशा मंदिरात घुसल्याने काही भाविकांनाही त्यांनी लक्ष्य केले.

देवीची पालखी घेऊन आलेले पालखीचे भोई संजय भोकरे यांनी पत्रकार कोरे यांचा चेहरा, मानेवर मधमाश्यांचा डंख झालेले असंख्य काटे कुशलतेने काढले. त्यानंतर जुन्नर रेस्क्यू टीमचे समन्वयक रूपेश जगताप, राजकुमार चव्हाण, सुजल बिडवई, ओम बिडवई तसेच पुरातत्व खात्याचे कर्मचारी गोकूळ दाभाडे यांनी त्यांना जुन्नरच्या ग्रामीण रुग्णालयात दाखल केले.

वैद्यकीय अधिकारी डॉ. राहुल सरदे यांनी तसेच खासगी रुग्णालयात डॉ. सुनील शेवाळे यांनी त्यांच्यावर उपचार केले. मधमाश्यांचा हल्ला गंभीर असला, तरी त्यांची प्रकृती स्थिर असल्याचे डॉ. सरदे यांनी सांगितले.

गडावर आलेल्या लातूरच्या शेतकर्‍यांच्या ग्रुपने उपरणी झटकत माश्यांचा प्रतिकार करण्याचा प्रकार केला. त्यामुळे माश्या उद्विग्न झाल्या आणि प्रतिहल्ला परतवताना माश्यांनी उग्ररूप धारण केले. पर्यटकांनी अशा घटना टाळण्यासाठी शिस्त पाळणे गरजेचे आहे.
- राहुल जोशी, अध्यक्ष, सह्याद्री गिरिभ्रमण संस्था, जुन्नर

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT