पुणे

शिरूरमध्ये परवानगीविनाच होर्डिंग! प्रशासनाला जाग येणार तरी कधी?

Laxman Dhenge

शिरूर : पुढारी वृत्तसेवा : शिरूर शहर हद्दीत नगरपरिषदेच्या हद्दीत विनापरवाना होर्डिंग्ज लावले असून, नगरपरिषदेकडे एकाही परवानगीची नोंद नाही. इतकी वर्षे बेकायदेशीरपणे व शासनाचा महसूल हे होर्डिंगमालक बुडवत आहेत. शिरूर शहर हद्दीत सतरा कमानी पूल ते पाषाण मळापर्यंत नगरपरिषदेची हद्द आहे. या हद्दीत साधारण 10 मोठे होर्डिंग्ज लावले आहेत. गेल्या अनेक वर्षांपासून हे होर्डिंग बिनधास्तपणे उभे आहेत, तसेच त्यांच्यावर लाखो रुपयांच्या जाहिराती झळकतात. त्यापोटी शासनाला कर भरणे आवश्यक असते; मात्र तो कर या होर्डिंगधारकांनी न भरता शासनाची फसवणूक केली आहे.

शिरीर शहराबाहेरून जाणार्‍या शिरूर-पुणे बायपासच्या कडेला बाबूरावनगर हद्दीत देखील अनेक बेकायदेशीर होर्डिंग लागले असून, तेसुध्दा धोकादायक आहेत. रस्त्याने ये-जा करणार्‍या वाहनांना त्याचा धोका होऊ शकतो. बिनधास्त लागलेल्या या होर्डिंगवर जाहिराती लावल्या जात आहेत. मात्र, शिरूर ग्रामीण ग्रामपंचायतीकडे देखील याची नोंद नाही. सर्व ठिकाणी आलबेल सुरू असून, शासनाच्या नियमांची पायमल्ली होत आहे.

शिरूर नगरपरिषदेच्या वतीने मागील वर्षी सर्व होर्डिंग्जधारकांना नोटीस बजावली होती. मात्र, परवानगी न घेतल्यामुळे त्यांना कारवाईची अंतिम नोटीस बजाविण्यात आली आहे. त्यांनी ते स्वत: काढले नाहीत, तर तीन दिवसांमध्ये शिरीर नगरपरिषद त्यांच्यावर कारवाई करणार आहे.

– पंकज काकड, सहायक अभियंता, शिरूर नगरपरिषद, नगररचना विभाग

सर्वसामान्य अन् होर्डिंगधारकांना वेगवेगळा न्याय

गेल्या अनेक वर्षांपासून हे होर्डिंग शहरात उभे आहेत; मात्र शिरूर नगरपरिषदेने याकडे काणाडोळा केला आहे. सर्वसामान्य नागरिकांनी एखादा कर भरला नाही किंवा एखाद्या गोष्टीसाठी परवानगी घेतली नाही, तर त्याच्यावर तातडीने कारवाई करणारी नगरपरिषद या होर्डिंगधारकांबाबत गप्प का आहे? याबाबत नागरिकांमध्ये चर्चा आहे.

हेही वाचा

SCROLL FOR NEXT