Gajanan Bhaskar Mehendale
सुनील माळी, पुणे
''अरे सुनील, गजाननराव आता औरंगजेबावर काम करताहेत... त्यांचं लिखाण जवळपास पुरंही झालंय...''
प्रदीपदादा रावतांच्या या वाक्यासरशी मी चमकलो अन चक्रावलोही.
चमकलो कारण आता लवकरात लवकर सिंहगड रोडच्या धायरीतल्या अभिरूची मागच्या सोसायटीत पोचायला हवं अन गजाननरावांच्या छोटेखानी फ्लॅटमध्ये मांडी घालून त्यांना औरंग्याबद्दलच्या बाहेर न आलेल्या गोष्टी सांगायचा आग्रह धरायला हवा.
चक्रावलो याचं कारण गजाननराव दोन्ही महायुद्धांवर काही हजार पानं लिहिताहेत, ती पुरी होत आली आहेत अशी बातमी कानावर होती तसंच त्यानंतरच्या थोडक्या दिवसांत इस्लामवरची त्यांचं काम बरच पुढं गेल्याचंही उडतउडत समजलं होतं. 'हे लिखाण झालं का ?', अशी चौकशी दादा रावतांच्या भेटीत करायचं मनात असतानाच त्यांनी हा तिसराच बॉम्ब टाकला... गजाननराव औरंगजेबावर लिहिताहेत ?... याला वेळ कसा काढला त्यांनी ? लिहायला अन त्यापेक्षाही महत्त्वाचं त्याचा अभ्यास करायला, त्याबाबत वाचायला ?...
अहो, एक साधा हजार-बाराशे शब्दांचा लेख लिहायचा म्हटलं तरी काही तास लागतात, नुसतं तयार पुस्तकाचं भाषांतर करायचं तर काही महिने मोडावे लागतात, असा अनुभव आणि तशीच कूर्मगती असल्यानं मी प्रथम चक्रावलो तरी गजाननराव म्हटल्यावर काहीही शक्य आहे, याची खात्री होती. गजाननरावांकडं जायचं ठरवत होतो, पण एकामागून एक कारणानं ते पुढं ढकललं जात होतं...
... काल ऑफिसातून घरी येऊन ताटावर बसलो तर मोबाईल वाजला. पुढारीची बातमीदार सुवर्णा चव्हाणचा फोन होता.
''सर, मी सुवर्णा बोलतेयं... गजानन मेहेंदळे गेले, कायकाय माहिती घेऊ आणि कुणाकडनं घेऊ ?''
''काय सांगतेस ?''
खरं सांगतो, अमुक व्यक्ती गेली, ही बातमी ऐकल्यावर मी हादरून जावं, अशी माझ्या दृष्टीनं या पृथ्वीतलावर उरलेल्या व्यक्तींची संख्या फारच कमीकमी होत चाललीये... गजाननराव त्यापैकीच एक होते.
विषण्णतेनं मोबाईल उघडला अन एकामागून एक ग्रुपवर गजाननराव यांची बातमी अन फोटो येत चालल्याचं जाणवलं. न राहवून एका बातमीवर लिहिलं... 'इतक्या उंचीचा सध्याच्या काळातला शेवटचा इतिहास संशोधक गेला...'
गेल्या शतकात अनेक मराठी शिवचरित्रकार होऊन गेले तसेच शिवकाळासह मराठा राजवटीवरही अनेक संशोधकांनी लिहिलं... अ. रा. कुलकर्णी आणि ज्येष्ठ-श्रेष्ठ इतिहासकार ग. ह. खरे यांचा मराठ्यांचा इतिहास, वा. सी. बेंद्रे, कृ. अ. केळूसकर, सेतुमाधवराव पगडी, वा. कृ. भावे, रियासतकार गो. स. सरदेसाई, त्र्यं. शं. शेजवलकर, बाबासाहेब पुरंदरे, विजय देशमुख. या प्रत्येक इतिहास संशोधकाचं-लेखकाचं वेगळेपण, वैशिष्ट्ये, दृष्टी यांचं मोल निश्चितच मोठं आहे, तसंच या ज्येष्ठ इतिहासकारांची तुलना करता येईल, इतका माझा इतिहासाचा अभ्यास नाही, पण या सर्व शिवचरित्रांकडं पाहून गजाननरावांनी सुरू केलेल्या अनेक खंडात्मक शिवचरित्राच्या व्यापकत्वाची किमान खूण तरी पटते. त्यांनी शिवचरित्र लिहायला घेतलं आणि दीड-दीड हजार पानांचे दोन खंड लिहून झाले तेव्हा कुठे ते अफजल वधापर्यत पोहोचले. या शिवचरित्रासाठी अभ्यासलेल्या साधनांच्या माहितीने त्यांनी सुरूवात केली आणि त्यासाठीच पहिल्या खंडाचा पहिला बराचसा भाग व्यापला गेला आहे. जे लिहिणार त्याला आधार असलाच पाहिजे, हा त्यांचा बाणा असल्याची जाणीव हे दोन्ही भाग वाचताना होते.
एकेका प्रसंगाला त्यांनी अनेको पुरावे दिले आहेत. त्यातील जे पुरावे विश्वास ठेवण्यास पुरेसे पात्र नाहीत, तिथे त्यांनी तसे स्पष्टपणानं नमूद केलंय. 'अफजल वधाची हकिकत केवळ शिवभारतमध्येच मिळते' असे सांगून शिवभारतातील रोमहर्षक, तपशीलवार वृत्तान्त ते कथन करतात. शिवउदयाआधीची शहाजी महाराजांची भरारी, रणदुल्लाखानाशी त्यांचा व्यवहार आदींचा तपशीलही आपल्याला समृद्ध करीत जातो.
... दुर्दैवानं, गजाननरावांनी शिवचरित्राचे दोन भाग लिहिल्यावर काही नको त्या दुर्दैवी घटना राज्याच्या सांस्कृतिक अवकाशात घडल्या अन त्यांनी आपलं लिखाण थांबवलं... इतिहासाबाबत कळणाऱ्या सुजाण चिकित्सकांपासून ते माझ्यासारख्या त्या विषयातलं फारसं काहीच न कळणाऱ्या अज्ञापर्यंतच्या शेकडोंनी अनेकदा गजाननरावांना पुढचे भाग पुरे करण्याचं साकडं घातलं. त्यांच्या प्रत्येक भेटीत लिखाणाचा आग्रह धरायचा, हे ठरून गेलं होतं. मध्यंतरी त्यांनी महाराजांचं इंग्लिशमधलं पूर्ण चरित्र तयार केलं. अर्थात ते तितकं तपशीलवार नव्हतं, पण हेही नसे थोडके असं म्हणून समाधान मानलं गेलं.
... एका शिवजयंतीच्या निमित्ताने त्यांचा लेख घ्यावा, म्हणून धायरीच्या घरी गेलो. काहीही विचारलं तरी त्याबद्दल अचूक माहिती त्यांच्याकडं हजर होती. कोणताही संदर्भ आला तरी 'हे हदीसमध्ये अमुक ठिकाणी आहे, हा मजकूर या प्रकरणाच्या या पानावर आहे', असं ते सांगत. महाराजांच्या पत्रांतील मजकुरावरून महाराजांचं व्यक्तित्त्व कसं उलगडत जातं, ते सांगताना ते रंगून अन आम्ही दंग होऊन गेलो. आमचा शिवचरित्राच्या पुढच्या खंडाचा प्रश्न होताच. त्यावर त्यांनी दोन्ही महायुद्धांवर लिखाण चालू असल्याचं आणि काही हजार पानं लिहून झाल्याचं सांगितलं अन आमची बोटं तोंडात गेली. मग त्यांनी सीमेवरचा आपला अनुभव आम्हाला सांगितला. तरीही आपल्या व्यासंगाचा कुठंही गर्व नाही की अभ्यासक असल्याची गु्र्मी नाही. अगदी नम्रपणानं स्वत: चहा करून पाजणार. बोलताना समोरच्याचा आदर ठेवणार.
... 'गजाननरावांच्या लेखनाचा झपाटा इतका मोठा कसा होता', या प्रश्नाचं उत्तर पांडुरंगराव बलकवडे यांनी मला दिलं. ते सांगतात, 'गजाननरावांची क्षमता अफाट होती. ते रात्री दहा वाजता गार पाण्यानं अंघोळ करून वाचन आणि लिहायला बसायचे, ते सकाळी सहा वाजेपर्यंत न थांबता वाचत-लिहित. सहा वाजता ते झोपत आणि चार तासाने म्हणजे दहाला उठून पुन्हा कामाला लागत. हे चारच तास झोपलेत, असे त्यावेळी कुणी म्हणूच शकणार नाही, एवढे ताजेतवाने असायचे. एकदा लिखाणाची तंद्री लागली की कधी अठरा-अठरा तास सलगही ते लिहित.' पांडुरंगरावांचा हा अनुभव ऐकूनच मला घाम फुटला.
... गजाननरावांची कधीतरी कुठेतरी भेट व्हायची. कधी कुठल्या कार्यक्रमाच्या निमित्तानं तर कधी हॉटेल रूपालीत. मेहेंदळे गँरेजजवळ ते राहात असत, तेव्हा त्यांनी आग्रहानं घरीही बोलावलं होतं. नंतर दादा रावतांमुळं ते धायरीच्या अभिरूचीमागच्या निवांत सोसायटीत राहायला गेले. आपलं आधीचं घर बदलून दादाही तिथंच राहायला आले आणि त्यांनी मोठ्या निगुतीनं, आस्थेनं, आपुलकीनं अन आदरानं गजाननरावांचा शेजार जपला. प्रकृतीच्या कुरबुरी असल्यानं लेखन अपुरं राहता कामा नये, यासाठी बाहेरच्या कार्यक्रमांवर त्यांनी मर्यादा आणली.
... या झपाट्यानं त्यांनी महाराजांच्या चरित्राच्या पुढच्या दोन खंडांचं लिखाणाचं काम पुरं करत आणलंय, महायुद्धांवर हजार पानांचे पाच खंड लिहून तयार झालेत, इस्लामवरची सहा हजार पाने तयार आहेत. त्यातल्या औरंगजेबाचा भाग काढून त्याचं स्वतंत्र पुस्तक तयार करण्याचं कामही सुरू आहे...
... या सगळ्या लेखनप्रपंचाच्या सांगतेची वेळ आली असतानाच गजाननरावांना मृत्यूनं गाठलं. त्यांच्या डोळ्यांच्या मोतिबिंदूची शस्त्रक्रिया पुरी झाली अन रूग्णालयात असतानाच त्यांना हृदयविकाराचा झटका आला... गजाननरावांचा निष्प्राण देह भारत इतिहास संशोधक मंडळाच्या सभागृहात ठेवला होता आणि समोरच्या गर्दीत फारसी भाषेचे तज्ज्ञ राजेंद्र जोशी भेटले. त्यांनी दोन दिवसांपूर्वीचा गजाननरावांचा व्हॉट्स अप मेसेज दाखवला. जोशी हैदराबादला गेले होते, तिथल्या संग्रहालयातील फारसी विभागातील औरंगजेबाच्या फर्मानाच्या सत्यतेबाबत शंका आल्याने त्यांनी ते पाहिले. त्यांनी गजाननरावांना मेसेज केल्यावर त्यांनी अचूक माहिती मेसेजने कळवली. 'केदारनं ज्या फर्मानाचा फोटो काढला, त्याविषयीच तुम्ही बोलताय ना ?, मी गेलो होतो तेव्हा फार्सी विभागप्रमुख दाऊद होते. ते त्याच दिवशी निवृत्त होणार होते. त्यांनी मला आताच्या प्रमुख परवीन यांची ओळख करून दिली होती. तेव्हा परवीन यांचे वय अगदीच कमी होते. आमची भेट त्यांच्या लक्षात असायची फारशी शक्यता नाही. नॉस्टेल्जिया म्हणून लिहिले. मराठी शब्द स्मरणरंजन...'
हा गजाननरावांचा परवा सकाळचा मेसेज होता.
आपल्या शेवटच्या दिवसापर्यंत व्यासंगात बुडालेला हा संशोधक होता. हिमालयाच्या उंचीचा असा माणूस कधी काळी होऊन गेला, आम्ही त्याला भेटलो आहोत, हे काही वर्षांनी सांगितलं तर पुढच्या पिढीचा विश्वास बसेल का ?... दु:ख वाटत राहील गजाननरावांना गमावल्याचं आणि हुरहूर वाटत राहील त्यांच्या शेवटच्या न झालेल्या भेटीची...