पुणे: हिंजवडी आयटी पार्क आणि परिसरातील वाहतूक कोंडी, सार्वजनिक वाहतूक, रस्ते, पाणीपुरवठा, वीज तसेच कचरा व्यवस्थापनाच्या प्रश्नावर जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी यांनी संबंधित विभागांची उच्चस्तरीय बैठक घेऊन आढावा घेतला. या समस्या सोडविण्यासाठी विविध यंत्रणांनी समन्वयाने आणि कालबद्ध पद्धतीने काम करण्याचे निर्देश त्यांनी दिले.
फीडर बससेवाही सुरू करण्याचे नियोजन
हिंजवडीतील वाहतूक कोंडी सोडविण्यासाठी आयटी कंपन्यांमधील कर्मचाऱ्यांच्या प्रवासाचा कंपनीनिहाय डेटा संकलित करण्यात येणार आहे. त्यानुसार पीएमपीएमएलच्या बसमार्गांचे नियोजन करून बससेवा वाढविण्यात येणार आहे. तातडीने २० ते ३० अतिरिक्त बस उपलब्ध करण्याचे नियोजन असून, भविष्यात येणाऱ्या ५०० नवीन बसमध्ये हिंजवडी आणि चाकण परिसराला प्राधान्य देण्यात येणार आहे. मेट्रो स्थानकांपासून कार्यालये आणि नागरिकांच्या घरांपर्यंत पोहचण्यासाठी फीडर बससेवाही सुरू करण्याचे नियोजन आहे.
रस्तारुंदीकरणासाठी हिंजवडी परिसरातील सहा प्रमुख रस्ते प्राधान्याने निश्चित करण्यात आले आहेत. आवश्यक भूसंपादन प्रक्रिया पूर्ण करून दि. १ डिसेंबरपर्यंत प्रत्यक्ष काम सुरू करण्याचे निर्देश देण्यात आले. रस्तारुंदीकरणात अडथळा ठरणारे वीजखांब आणि भूमिगत केबल्स तातडीने हलविण्यासाठी संबंधित विभागांनी अंदाजपत्रक तयार करावे, अशी सूचना देण्यात आला. सर्व्हिस रोडचे डांबरीकरण पुढील १० ते १५ दिवसांत पूर्ण करण्याचेही निर्देश आहेत.
नवीन वीज उपकेंद्रांच्या कामाला गती मिळणार
वीजपुरवठा सुरळीत करण्यासाठी हिंजवडी परिसरात नवीन वीज उपकेंद्रांच्या कामाला गती देण्यात येणार आहे. लवळे आणि महाळुंगे येथील प्रस्तावित उपकेंद्रांसाठी मंजुरी प्रक्रिया जलदगतीने पूर्ण करण्यासोबतच आवश्यक जागा ॲडव्हान्स पझेशनने उपलब्ध करून देण्याच्या सूचना देण्यात आल्या.
पाणीपुरवठ्याची प्रस्तावित योजना तातडीने पूर्ण करण्याचे निर्देश देण्यात आले तसेच घनकचरा व्यवस्थापनासाठी ग्रामपंचायतींच्या समन्वयातून महिनाभरात ठोस कृती आराखडा तयार करण्यात येणार आहे. सोसायट्यांमधील कचरा संकलन आणि व्यवस्थापनासाठी प्रभावी यंत्रणा उभारण्यास सात दिवसांची मुदत देण्यात आली. हिंजवडीतील बसथांबे, बसशेल्टर आणि मेट्रो परिसराचे सुशोभीकरण करण्याचाही निर्णय घेण्यात आला. स्थानिक नागरिक आणि संबंधित भागधारकांशी चर्चा करून बसथांब्यांची ठिकाणे निश्चित केली जाणार आहेत.
हिंजवडी परिसरातील उपाययोजना शास्त्रीय आणि नियोजनबद्ध पद्धतीने झाल्या पाहिजेत. वाहतूक, पाणी आणि वीज या मूलभूत सुविधांचा समन्वय साधून नागरिक आणि आयटी क्षेत्रातील मनुष्यबळाला आवश्यक सुविधा लवकर उपलब्ध करून देण्यात येतील, असे जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी यांनी सांगितले.
बैठकीस आमदार शंकर मांडेकर, निवासी उपजिल्हाधिकारी ज्योती कदम तसेच हिंजवडी, मान आणि मारुंजे परिसरातील नागरिक उपस्थित होते. कामांच्या प्रगतीचा नियमित आढावा घेण्यात येणार असून, पुढील आढावा बैठक गुरुवारी दुपारी चार वाजता होणार आहे.