Hinjewadi Shivajinagar Metro Pudhari
पुणे

Hinjewadi Shivajinagar Metro: उद्घाटनाच्या मुहूर्तासाठी हिंजवडी मेट्रो रखडली; १२ स्थानके तयार, सीएमआरएसची मंजुरीही मिळाली

आयटी नगरीतील वाहतूक कोंडीने नागरिक हैराण; मेट्रो सेवा तातडीने सुरू करण्याची मागणी

पुढारी वृत्तसेवा

पुणे: हिंजवडी ते शिवाजीनगर मेट्रो मार्गिकेवरील पहिल्या टप्प्यातील १२ स्थानकांचे काम पूर्ण होऊन आणि केंद्रीय रेल्वे सुरक्षा आयुक्तांची (सीएमआरएस) मंजुरी मिळूनही फक्त उद‌्घाटनाच्या प्रतीक्षेत ही मेट्रोसेवा रखडल्याचे समोर आले आहे. यामुळे आयटीनगरीतील वाहतूक कोंडीने हैराण झालेल्या नागरिकांमधून तीव्र संताप व्यक्त होत आहे.

​पुणे महानगर क्षेत्र विकास प्राधिकरणाच्या (पीएमआरडीए) माध्यमातून माण ते बालेवाडी या पहिल्या टप्प्यातील मेट्रोमार्गाचे काम हाती घेण्यात आले आहे. या मार्गावरील एकूण २३ पैकी १२ स्थानकांची सर्व कामे पूर्ण झाली आहेत. तसेच, सीएमआरएसचे मंजुरी सुरक्षा प्रमाणपत्रही प्राप्त झाले आहे.

असे असतानाही फक्त राजकीय उद्घाटनाच्या मुहूर्तामुळे ही सेवा लालफितीत अडकली आहे. परिणामी, लाखो प्रवाशांना दिलासा देणारी ही यंत्रणा असूनही ती बंदिस्त अवस्थेत आहे.​हिंजवडी आणि माण परिसर हे जागतिक पातळीवरील प्रमुख माहिती तंत्रज्ञान (आयटी) आणि औद्योगिक केंद्र आहे. येथे दररोज हजारो कर्मचारी शहराच्या विविध भागांतून कामासाठी येतात.

मात्र, अपुऱ्या रुंदीचे रस्ते आणि वाढत्या वाहनांच्या संख्येमुळे या भागात रोजच भयानक वाहतूक कोंडी होते. तासन् तास ट्रॅफिक जाममध्ये अडकल्यामुळे कर्मचाऱ्यांचा मौल्यवान वेळ आणि ऊर्जा वाया जात आहे. ​त्यामुळे प्रशासनाने कोणत्याही विलंबाविना ही १२ मेट्रो स्थानके तातडीने प्रवासी सेवांसाठी खुली करावीत, अशी मागणी होत आहे.

हिंजवडी भागात औद्योगिक आणि आयटी कंपन्या सर्वाधिक आहेत. हा भाग पूर्णपणे औद्योगिक आणि आयटी हब आहे. त्यामुळे शहराच्या अन्य भागांतून कर्मचारी या भागात येत असतात. त्यांना येथील रस्ते अपुरे पडत असल्यामुळे दररोज वाहतूक कोंडीचा नाहक त्रास सहन करावा लागत आहे. त्यामुळे हिंजवडी मेट्रोच्या १२ स्थानकांचे काम पूर्ण झाले असेल, तर ती स्थानके प्रवासी वाहतुकीसाठी तातडीने सुरू करावीत.
सोनाली देशमुख, आयटी कर्मचारी

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT