पुणे: तिसरीपासून कौशल्य शिक्षण, सहावीपासून हिंदी भाषेचे ज्ञान, अकरावीच्या विद्यार्थ्यांना कोणत्याही शाखांचे विषय निवडण्याची मुभा, शालेय शिक्षणात एआय वापराचे ज्ञान, असे एक ना अनेक बदल इयत्ता तिसरी ते बारावीच्या अभ्यासक्रमात या पुढील काळात पाहायला मिळणार आहेत. कारण, तशा प्रकारचा राज्य अभ्यासक्रम आराखडाच तयार करण्यात आल्याचे स्पष्ट झाले आहे.
तिसरी ते बारावीचा पाठ्यक्रम तयार करण्यासाठी राज्य अभ्यासक्रम आराखडा (शालेय शिक्षण)-2024 मसुदा राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद अर्थात विद्या प्राधिकरणामार्फत तयार करण्यात आला आहे. संबंधित राज्य अभ्यासक्रम आराखडा (शालेय शिक्षण) 2024 मसुद्यामध्ये विविध गोष्टींचा समावेश करण्यात आला आहे. (Latest Pune News)
राज्य अभ्यासक्रम आराखड्यात देण्यात आलेल्या माहितीनुसार, पहिली ते दहावीसाठी मराठी व इंग्रजी भाषा अनिवार्य करण्यात आली आहे. तर सहावीपासून हिंदी, संस्कृतसह अन्य भारतीय व परदेशी भाषा शिकण्याचा पर्याय उपलब्ध करून देण्यात आला आहे.
अकरावी आणि बारावीसाठी दोनच भाषांचे शिक्षण देण्यात येणार आहे. त्यामुळे अकरावी- बारावीत तिसरी भाषा नेमकी कोणती वगळण्यात येणार याबाबत अनिश्चितता निर्माण झाली आहे.
तिसरीपासून व्यावसायिक शिक्षणाची सोय करण्यात आली आहे. यामध्ये तिसरी ते आठवीपर्यंत पूर्व व्यावसायिक कौशल्ये आणि नववीपासून विशेष व्यावसायिक शिक्षणाची सोय करण्यात येणार आहे. व्यावसायिक शिक्षणांतर्गत, कृत्रिम बुद्धिमत्ता, मशिन लर्निंग, डाटा सायन्स, कृषी, इत्यादी नावीन्यपूर्ण विषय उपलब्ध होणार आहेत. व्यावसायिक शिक्षणाच्या माध्यमातून विद्यार्थी किमान कौशल्ये तसेच व्यावसायिक ज्ञान संपादन करू शकेल.
राष्ट्रीय अभ्यासक्रम अराखड्यानुसार, गणित व विज्ञान विषयांचे दोन स्तरावरील अभ्यासक्रम विचाराधीन आहेत. अकरावी- बारावीमध्ये (कला, वाणिज्य, विज्ञान, व्यावसायिक) शाखांचे बंधन असणार नाही.
विद्यार्थ्यांना कोणत्याही शाखेचे विषय निवडता येतील. (उदा. विज्ञान शाखेचा विद्यार्थी वाणिज्य तसेच कला शाखेची विषय निवडू शकेल.) विद्यार्थ्यांना मूल्यांचे शिक्षण- सांविधानिक मूल्ये, मानवी मूल्ये, नैतिक मूल्यांचे शिक्षण. (स्वच्छता, सेवा, अहिंसा, सत्य, निष्काम कर्म, सहनशीलता, प्रामाणिकपणा) शाळेमध्ये मार्गदर्शन व समुपदेशन- विद्यार्थ्यांचे शारीरिक आरोग्य, मानसिक आरोग्य याबाबत मार्गदर्शन तसेच शैक्षणिक व व्यावसायिक मार्गदर्शन करण्यात येणार आहे.
शारीरिक शिक्षण व निरामयता हा विषय शालेय अभ्यासक्रमाचा एक अविभाज्य भाग ठरवून महाराष्ट्रातील स्थानिक खेळाला महत्त्व, शाळेत क्रीडा संस्कृती रुजविण्यावर भर, आनंददायी शिक्षणावर भर, मूल्यमापनाची आधुनिक तंत्रे वापरण्यावर भर देण्यात येणार आहे. आनंददायी शिक्षणासाठी कलेचे महत्त्व अधोरेखित केले आहे.
महाराष्ट्रातील पारंपरिक कलाप्रकार तसेच सांस्कृतिक वारसा असणार्या कला यांचा कलाशिक्षणात समावेश केला आहे. आपापल्या भागातील लोककलांचा समावेश करण्याची मुभा कला शिक्षणात दिली आहे. कला निर्मितीत पर्यावरण पूरक साहित्य वापरणे व त्यातून पर्यावरण रक्षणाचा संदेश देणे असा प्रयत्न केला आहे. या मसुद्याबाबत सर्व समाज घटक, शिक्षक, पालक, शिक्षण तज्ज्ञ, शैक्षणिक प्रशासनाला अभिप्राय देण्याची संधी दिली होती.
नव्या अभ्यासक्रमात होणारे बदल
बदलत्या जगाची आव्हाने पेलण्यासाठी मानवी मूल्य, जीवन कौशल्य व नैतिकतेवर आधारित तार्किक विचार करणारे शिक्षण दिले जाईल.
आरोग्य, कला, व्यवसाय शिक्षण या विषयांचे ही प्रचलित विषयांसोबत महत्त्व वाढवले जाईल. चिकित्सक वृत्ती, विज्ञाननिष्ठ पुराव्यावर आधारित चिकित्सक विचार करण्याची वृत्ती विकसित होईल.
आशयाचे ओझे कमी करून सखोल संकल्पना व महत्त्वाच्या क्षमता मूल्ये कौशल्य विकसित होतील यावर भर आहे. स्वतः कृतीतून ज्ञान निर्मिती करतील.
शालांत परीक्षेचे घोकमपट्टी व स्मरणावर आधारित परीक्षा हे स्वरूप बदलून प्राप्त कौशल्यांचे मूल्यमापन करण्यासाठी योजना असतील.
परीक्षेसाठी एकाच सत्राचा अभ्यासक्रम
काही विषयांचे मूल्यमापन मंडळस्तरावरून आणि काही विषयांचे मूल्यमापन शाळास्तरावर करण्याची बाब विचाराधीन आहे. सत्र पद्धतीचा अवलंब करणे विचाराधीन असल्यामुळे विद्यार्थ्यांना वार्षिक परीक्षेवेळी येणारा ताण कमी होईल आणि परीक्षेसाठी एकाच सत्राचा अभ्यासक्रम असेल.