पुणे: हिरवट रंगाचे, तुरट आणि गोड चवीच्या पिअरचा हंगाम सुरू झाल्याने बाजारात पिअर दाखल होऊ लागले आहे. मार्केट यार्डात गुरुवारी या फळांच्या एक हजार बॉक्सची बाजारात आवक झाली. घाऊक बाजारात 22 किलोंच्या बॉक्सला दर्जानुसार 2500 ते 3000 रुपये भाव मिळाला.
पिअरचे व्यापारी सत्यजित झेंडे म्हणाले, हिमाचल प्रदेश येथून ही या फळाची आवक होते. यंदा हंगाम वेळेत सुरू झाला असून, पोषक वातावरणामुळे गतवर्षीच्या तुलनेत यंदा उत्पादनही चांगले आहे. सद्य:स्थितीत हंगामाची सुरुवात असल्याने दर जास्त आहेत. येत्या काळात आवक वाढून पिअरचे दर खाली येतील. (Latest Pune News)
गुलटेकडी मार्केट यार्डातील फळबाजारातून पुणे शहर, जिल्ह्यासह सातारा, नगर जिल्ह्यात पिअर विक्रीसाठी जात आहेत. पिअर हे सफरचंदाच्या वर्गातील फळ आहे. सफरचंदानंतर सर्वाधिक हे फळ खाल्ले जाते. हे फळ मूळचे अमेरिका, आफ्रिका खंडातील आहे. त्याचे आता आपल्या देशातही चांगले उत्पादन होत असल्याचे झेंडे यांनी नमूद केले.
वॉटलेट पिअरला पुणेकरांची पसंती
फळबाजारात वॉटलेट पिअर आणि पिअर अशा दोन प्रकारांमध्ये पिअर येतो. त्यापैकी वॉटलेट पिअर बाजारात दाखल होण्यास सुरुवात झाला आहे. वॉटलेट पिअर हा खाण्यास मऊ असतो तर पिअर हा कडक असतो. याखेरीज वॉटलेट पिअर तीन ते चार दिवस टिकतो, तर पिअर हा सात ते आठ दिवस टिकून राहतो.