पिंपरी : पुढारी वृत्तसेवा : पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या थेरगाव कर संकलन विभागीय कार्यालयात सर्वांधिक 83 कोटी 73 लाख 99 हजार 622 मिळकतकराचा भरणा झाला आहे. तर, सर्वांत कमी 2 कोटी 52 लाख 25 हजार 62 रूपयांचा कर पिंपरी कॅम्प कार्यालयात जमा झाला आहे. आतापर्यंत मिळकतकर बिलांपोटी एकूण 328 कोटींची रक्कम पालिका तिजोरीत जमा झाली आहे.
पिंपरी-चिंचवड शहरात एकूण 5 लाख 50 हजारांपेक्षा अधिक मिळकती आहेत. त्यांच्याकडून महापालिकेच्या कर संकलन कार्यालय दरवर्षी मिळकतकर वसूल करते. कर संकलन विभागाचे शहरात एकूण 16 विभागीय कार्यालये आहेत.
एक एप्रिल 2021 ते 31 मार्च 2022 या आर्थिक वर्षांत शुक्रवार (दि.17) पर्यंत म्हणजे साडेआठ महिन्यांत एकूण 328 कोटी 82 लाख 48 हजार 105 रूपयांचा भरणा सर्व 16 कार्यालयातून झाला आहे. आतापर्यंत एकूण 2 लाख 29 हजार 273 मिळकतधारकांनी मिळकतकरांची बिले भरली आहेत. अद्याप, निम्म्यापेक्षा अधिक मिळकतधारकांनी बिले भरलेली नाहीत.
सर्वांधिक 83 कोटी 73 लाख 99 हजार 622 रूपयांचा भरणा थेरगाव कार्यालयात झाला असून, एकूण 5 हजार 603 मिळकतधारकांनी बिल भरले आहे. पाठोपाठ सांगवी कार्यालयात एकूण 27 हजार 468 मिळकतधारकांनी एकूण 31 कोटी 88 लाख 10 हजार 838 रूपये जमा केले आहेत.
पिंपरी गाव कार्यालयात 25 कोटी 3 लाख 30 हजार 10 रूपये जमा झाले आहेत. एकूण 18 हजार 856 नागरिकांनी बिले भरली आहेत. भोसरी कार्यालयात 14 हजार 171 नागरिकांनी 23 कोटी 90 लाख 11 हजार 773 चा भरणा झाला आहे. चिंचवड कार्यालयात 22 हजार 755 नागरिकांनी 21 कोटी 56 लाख 33 हजार 658 रूपये जमा झाले आहेत.
आकुर्डी कार्यालयात 18 कोटी 78 लाख 77 हजार 500, मोशी कार्यालयात 18 कोटी 58 लाख 29 हजार 783, किवळे कार्यालयात 16 कोटी 45 लाख 82 हजार 326, फुगेवाडी- दापोडी कार्यालयात 14 कोटी 88 लाख 63 हजार 791, निगडी- प्राधिकरण कार्यालयात 11 कोटी 39 लाख 42 हजार 163, दिघी-बोपखेल कार्यालयात 7 कोटी 23 लाख 50 हजार 884, चर्होली कार्यालयाने 6 कोटी 70 हजार 964 आणि तळवडे कार्यालयाने 4 कोटी 41 लाख 6 हजार 678 रूपयांचा भरणा झाला आहे.
शहरात 5 लाख 50 हजारांपेक्षा अधिक निवासी व बिगरनिवासी मिळकती आहेत. त्या मिळकतधारांना मिळकतकरांची बिले पाठविण्यात आली आहे.
तसेच, महापालिकेच्या संकेतस्थळावर जाऊन ऑनलाइन बिल काढून ऑनलाइन माध्यमातून तत्काळ भरणा करण्याची सुविधा आहे. मिळकतधारकांनी लवकरात लवकर थकबाकीसह संपूर्ण बिलाची रक्कम जमा करून महापालिकेस सहकार्य करावे, असे आवाहन कर संकलन विभागाच्या उपायुक्त स्मिता झगडे यांनी केले आहे.