पुणे

गुन्हा दाखल करण्यासाठी पोलिस ठाण्याचे हेलपाटे..!

Laxman Dhenge

पुणे : पुढारी वृत्तसेवा : फसवणूक झालेल्या सेवानिवृत्त अधिकार्‍याला गुन्हा दाखल करण्यासाठी कोंढवा पोलिस ठाण्यात हेलपाटे मारावे लागत आहेत. संबंधित अधिकार्‍याला अपघातामुळे दिव्यांगत्व आले आह. या परिस्थितीतही पोलिसांकडून सहकार्य होत नसून, आरोपींऐवजी त्यांनाच अरेरावी केली जात असल्याचा आरोप अधिकार्‍याने केला आहे. याप्रकरणी अधिकार्‍याने परिमंडळाच्या उपायुक्तांसह विभागीय पोलिस तक्रार प्राधिकरणाकडेही तक्रार केली आहे.

शेअर बाजारात गुंतवणुकीच्या आमिषाने कोंढवा परिसरात राहणार्‍या जावेद इनामदार या सेवानिवृत्त अधिकार्‍याची दोघांनी सहा लाख रुपयांची फसवणूक केली आहे. इनामदार हे राज्य सरकारच्या ग्रामीण विकास विभागात वरिष्ठ अधिकारी पदावरून निवृत्त झाले आहेत. ते कर्तव्यावर असताना काही वर्षांपूर्वी रस्ते अपघातात त्यांना अपंगत्व आले आहे. सेवानिवृत्तीनंतर इनामदार यांना भविष्यनिर्वाहनिधी किंवा अन्य माध्यमातून मिळालेले पैसे त्यांनी दोन व्यक्तींकडे गुंतवले होते. एकाकडे दोन लाख, तर दुसर्‍याकडे चार लाख गुंतवले आहेत. मात्र, त्यांना गुंतवणुकीवरील नफा किंवा मुद्दल परत मिळाली नाही. त्यामुळे इनामदार यांनी 22 डिसेंबर 2023 या दिवशी कोंढवा पोलिसांकडे तक्रार अर्ज दिला आहे.

त्या अर्जावर कार्यवाही करताना कोंढवा पोलिसांनी सुरुवातीला तक्रारदाराचा किंवा आरोपींचा जबाब घेतला नाही. 'फसवणूक करणार्‍या दोघांनी तक्रारदाराला 25 जानेवारीला पैसे देतो,' असे कबूल केल्याचे पोलिसांनी आरोपीला सांगितले. त्यानुसार त्यांच्यात करारनामा करण्यात आला. मात्र, तक्रारदाराला त्यानंतरही पैसे मिळाले नाहीत. त्यामुळे त्यांनी पुन्हा पोलिसांशी संपर्क साधला. तसेच, तपास अधिकारी चांगले काम करीत नसल्याची तक्रार करून तपास अधिकारी बदलून देण्याची विनंती वरिष्ठ निरीक्षकाकडे केली. त्यानंतर फेब्रुवारी 2024 मध्ये इनामदार यांचा पहिला जबाब नोंदवण्यात आला. मात्र, त्यांना जबाबाची प्रतही देण्यात आली नाही. त्यानंतर दोघांनी तक्रारदाराला मार्चमध्ये पैसे परत देण्याचे आश्वासन तक्रारदाराला देण्यात आले. तेही एका व्यक्तीने तक्रारदाराला केवळ 95 हजार रुपये दिले. पण, उर्वरित पैशांची त्यांना अद्यापही प्रतीक्षाच आहे. दरम्यान, याप्रकरणी फसवणुकीचा गुन्हा दाखल करावा, यासाठी तक्रारदाराने पोलिसांकडे पाठपुरावा केला असता, त्यांना चांगली वागणूक देण्यात आली नाही, असा आरोप इनामदार
यांनी केला.

संबंधित तक्रारदाराकडून तक्रार अर्ज प्राप्त झाल्यानंतर हे प्रकरण दिवाणी स्वरूपाचे आहे, असे त्यांना सांगितले होते. मात्र, मदतीच्या भावनेने फसवणूक करणार्‍या व्यक्ती आणि तक्रारदाराला समोरासमोर बोलावून त्यांचे पैसे परत मिळवून देण्याचा प्रयत्न करू, असे सांगितले होते. त्या दृष्टीने प्रयत्न केले जात होते. तक्रारदारांना बोलावून घेऊन याबाबत तत्काळ कार्यवाही केली जाईल.

– संतोष सोनावणे, वरिष्ठ निरीक्षक, कोंढवा पोलिस

हेही वाचा

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT