पुणे

पुणे : ‘हॅलो फॉरेस्ट’ उपक्रमाला लागली घरघर!

अमृता चौगुले

सुनील जगताप

पुणे : वनविभागाच्या हद्दीत झालेल्या विविध दुर्घटनांची माहिती त्वरित मिळविण्याच्या हेतूने वनविभागाने 1926 हा टोल फ्री क्रमांक हॅलो फॉरेस्टच्या माध्यमातून सुरू केला आहे. मात्र, सध्या तो बंद असल्याने नागरिकांची अडचण होत आहे.

लोकसहभागातून वन, वन्यजीव संवर्धन व संरक्षण प्रभावीपणे होण्यासाठी वनविभागाने महत्त्वपूर्ण पाऊल उचलून 1926 हा नि:शुल्क (टोल फ्री) क्रमांक सुरू केला आहे. त्यावर नागरिकांकडून हॅलो फॉरेस्टकडे तक्रार नोंदवून माहिती दिली जाते. मात्र, गेल्या काही दिवसांपासून हा नंबरच बंद आहे. त्या संदर्भात वन विभागाच्या अधिकार्‍यांकडे सर्वसामान्यांनी तक्रार करूनही दखल घेतली जात नाही.

वन वणवा, वन्यजीव तस्करी, अतिक्रमण, अवैध वृक्षतोड आदींच्या तक्रारींची नागरिकांकडून माहिती दिली जाते. मात्र, हा नंबर बंद असल्याची माहिती वन अधिकार्‍यांनाही नसल्याचे दिसून आले आहे.

तक्रारीची दखलच घेतली जात नाही

वनखात्याची 1926 क्रमांकाची मदतवाहिनी गेल्या अनेक दिवसांपासून बंद आहे. काही वर्षांपूर्वी ही मदतवाहिनी चालू होती, तेव्हा तक्रार करूनसुद्धा दखल घेतली गेली नाही. अवैध वृक्षतोडीविषयी मी अनेक वेळा या मदतवाहिनीवर तक्रार नोंदविली आहे, पण त्यावर एकदाही कार्यवाही झाली नाही. माझ्या तक्रारीचा क्रमांकही अनेक वेळा मिळालेला नाही.
– संजय नाईक, पर्यावरणप्रेमी

हॅलो फॉरेस्ट पुन्हा चालू करणार

लोकांचा सहभाग वाढावा या हेतूने शासनाने हॅलो फॉरेस्ट नावाने टोल फ्री क्रमांक सुरू केलेला आहे. त्यावर नागरिकांच्या येणार्‍या तक्रारींचे निराकरणही अधिकार्‍यांमार्फत केले जाते. मात्र, हा टोल फ्री क्रमांक बंद असेल, तर तांत्रिक बाजू तपासून लवकरच हा क्रमांक पुन्हा सुरू केला जाईल.
                                                           – दत्तात्रय भरणे, राज्यमंत्री, वन विभाग

SCROLL FOR NEXT