वेल्हे: जिल्ह्यातील एक कोटी नागरिकांची तसेच 66 हजार हेक्टर शेतीची तहान भागवणार्या खडकवासला धरण साखळीत गेल्या तीन महिन्यांच्या पावसाने क्षमतेच्या दुप्पट म्हणजे जवळपास 58 टीएमसी पाण्याची आवक झाली आहे.
त्यातील 22 टीएमसी पाण्याचा लाभ उजनी धरणाला तर 7 टीएमसी पाण्याचा लाभ पुणेकरांसह शेतीला झाला आहे. जादा पाणी सोडूनही खडकवासला धरण साखळी जवळपास 100 टक्के भरून वाहत आहे. बुधवारी (दि. 27) सायंकाळी 5 वाजता धरण साखळीत 28.33 टीएमसी म्हणजे 97.18 टक्के साठा झाला होता. (Latest Pune News)
घाट माथ्यासह धरण क्षेत्रात पावसाचा जोर कमी झाला आहे; मात्र रिमझिम सुरू आहे. पाण्याची आवक सुरू असल्याने चारही धरणांतून विसर्ग सुरू आहे. पावसाळा संपण्यास अद्याप सव्वा महिना शिल्लक आहे. यंदाच्या पावसाळ्यात सोमवारपर्यंत खडकवासला धरणातून मुठा नदीत 22.05 टीएमसी पाणी सोडण्यात आले आहे.
सध्या धरणातून 8 हजार 517 क्सुसेक पाणी सोडले जात आहे. त्यामुळे मुठा नदीत सोडण्यात येणार्या पाण्यात वाढ होणार आहे. खडकवासला, पानशेत, वरसगाव व टेमघर या चार धरणांच्या खडकवासला धरण साखळीची एकूण पाणी साठवण क्षमता 29.15 टीएमसी इतकी आहे.
पानशेत, वरसगाव व टेमघर धरण क्षेत्रातील रायगड जिल्ह्याच्या हद्दीवरील तव, माणगाव, पोळे, टेकपोळे, शिरकोली, धामण ओहोळ, दासवे, मुगाव, साखरी परिसरात चार ते पाच पट अधिक पाऊस पडत आहे.
टेमघर येथे विक्रमी 2 हजार 969 मिलीमीटर पाऊस
दि. 1 जुनपासून 27 ऑगस्टपर्यंत टेमघर येथे विक्रमी 2 हजार 969 मिलीमीटर पाऊस पडला. याच कालावधीत पानशेत येथे 1 हजार 925, वरसगाव येथे 1 हजार 923 व खडकवासला येथे 613 मिलीमीटर पाऊस पडला.
धरण खोर्यात चांगला पाऊस झाल्याने गेल्या तीन महिन्यांत धरण साखळीत जवळपास 58 टीएमसी पाण्याची आवक झाली आहे. तीन महिन्यात धरण साखळीतून आतापर्यंत 22 टीएमसीपेक्षा अधिक पाणी मुठा नदीत तर 7 टीएमसी पिण्यासह शेतीला सोडले आहे. अद्यापही धरण क्षेत्रात दमदार पाऊस पडत आहे. त्यामुळे जादा पाणी सोडले जात आहे. मुठा नदीच्या पूर नियंत्रणासाठी खडकवासलाची पातळी 70 टक्क्यांपर्यंत ठेवली जात आहे.- मोहन भदाणे, उपविभागीय अभियंता, खडकवासला जलसंपदा विभाग