बावडा: बावडा (ता. इंदापूर) परिसरात सलग दोन दिवस जोरदार पावसाने हजेरी लावली. या रात्रभर झालेल्या पावसामुळे मका पिकाचे नुकसान झाले आहे. दरम्यान, सलग तिसऱ्या दिवशी मंगळवारीही (दि. 23) येथे ढगाळ वातावरण कायम होते.
सध्या खरीप हंगामातील मका पिकाच्या काढणी, मळणीच्या कामास सुरुवात झाली आहे. या पावसाने शेतात काढून टाकलेली मक्याची कणसे पावसात भिजली आहेत. तसेच मका पिकाच्या काढणीच्या कामांमध्ये पावसाने अडथळा निर्माण झाल्याचे शेतकऱ्यांनी सांगितले.
आता रविवारी (दि. 21) आणि सोमवारी (दि. 22) रात्रभर जोरदार पाऊस झाला. यामुळे मका पिकात काही ठिकाणी पाणी साचले होते. या पाण्यामुळे पिकाच्या वाढीवर विपरीत परिणाम होणार आहे. तसेच पाऊस कायम राहिला तर मका पीक कुजून जाण्याचा धोकाही निर्माण झाला आहे. दरम्यान सध्या होत असलेल्या पावसामुळे चाऱ्याचा प्रश्न मिटला असल्याचे दूधगंगा दूध उत्पादक सहकारी संघाचे संचालक दयानंद गायकवाड व सागर सवासे- बोराटवाडी यांनी सांगितले.