वाल्हे: वाल्हे (ता. पुरंदर) परिसरातील बदलत्या वातावरणामुळे ऊस पिकांवर हुमणी अळीचा प्रादुर्भाव निर्माण झाला आहे. हुमणी भुंगेऱ्यांनी घातलेल्या अंड्यांमधून आता अळ्या बाहेर येत आहेत.
मागील वर्षी ऑक्टोबर महिन्यांत केलेली ऊस लागवड, तसेच नव्याने केलेल्या आडसाली ऊस लागवडीवर याचा गंभीर परिणाम दिसून येत आहे. अळी पिकांच्या मुळांना खात असल्याने पिके वाळू लागली आहेत. (Latest Pune News)
हुमणी अळी ऊस, मका, सोयाबीन, भुईमूग यांसारख्या पिकांच्या मुळांना खाते. त्यामुळे पिकांचे पाणी आणि अन्न शोषण थांबते. परिणामी पाने पिवळी पडतात. तसेच 15-20 दिवसांत पीक पूर्णपणे वाळून जातात. त्याचा फटका शेतकऱ्यांना सहन करावा लागणार आहे.
हुमणीचा प्रादुर्भाव गेल्या काही वर्षांपासून वाढत आहे. यामुळे पिकांचे 30 ते 80 टक्के नुकसान होते. दुबार लागणीमुळे शेतकऱ्यांना बियाणे, खत, मजुरी आणि पाण्याचा अतिरिक्त खर्च सहन करावा लागतो. वाल्हे येथील प्रगतशील शेतकरी विक्रमसिंह भोसले यांच्या चार एकर उसाला मोठ्या प्रमाणावर हुमणी अळीचा प्रादुर्भाव निर्माण झाला आहे. विविध औषधे फवारूनही अद्यापपर्यंत हुमणीचा प्रादुर्भाव कमी होत नाही, अशी माहिती भोसले यांनी दिली.
पावसाची अनियमितता, वाढती उष्णता यांचा हा परिणाम होत आहे. अशा स्थितीत जोरदार पावसाची प्रतीक्षा करणे हा एकच उपाय शेतकऱ्यांच्या हाती राहिला आहे. जोरदार पावसामुळे शेतात पाणी साचून राहिले तरच हुमणीचा प्रादुर्भाव कमी होणार असल्याचे शेतकरी सांगतात.
मे महिन्यांच्या अखेरीस मॉन्सूनपूर्व जोरदार पावसामुळे हुमणीचा काही प्रमाणात नायनाट झाला होता. यानंतर पावसाने दडी मारली. ऊन-पावसाचा खेळ, निर्माण झालेली उष्णता यामुळे हुमणीच्या वाढीला पोषक वातावरण निर्माण बनले होते.
या अळ्या सध्या लागवडीच्या तसेच मागील वर्षी लागवड केलेल्या उसाच्या पांढऱ्या मुळ्यांना लक्ष करत आहेत. माळरानावरील हुमणीला पोषक वातावरण निर्माण झाले. आता ऊस लागण केल्यानंतर उसाच्या पांढऱ्या मुळ्या हुमणीचे खाद्य बनले आहे. मुळाशीच हुमणी लागत असल्याने वरून केलेल्या फवारणीचा उपयोग होत नाही.
प्रादुर्भाव रोखण्यासाठी आळवणीचा खर्च मोठा असल्याने अनेक शेतकरी याकडे दुर्लक्ष करतात. यामुळे उभी पिके वाळून जात आहेत. ऊस पिकांमध्ये हुमणी किडीचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणात वाढला आहे. या किडीचे तातडीने नियंत्रण करणे गरजेचे आहे. त्यासाठी रासायनिक आणि जैविक या दोन पद्धतीने नियंत्रण करता येत असल्याचे सहाय्यक कृषी अधिकारी संतोष जायप?े यांनी सांगितले.
रासायनिक कीड नियंत्रण पद्धत
या प्रकारच्या कीड नियंत्रणामध्ये दोन प्रकारच्या रासायनिक कीडनाशकांचा समावेश होतो. इमिडाक्लोप्रिड (40 टक्के व फिप्रोनिल 40 टक्के) 100 ग्रॅम लेसेंटा 200 लिटर पाण्यात वापरावे. सोबत (डेल्टामेथिन) 250 मि.ली. 200 लिटर पाण्यात मिसळून आळवणी करावी. या दोन्ही रासायनिक कीडनाशके वरील प्रमाणानुसार 200 लिटर पाण्यात एकत्र मिसळून वाफशावेळी आळवनी करावी.
जैविक कीड नियंत्रण
रासायनिक कीडनाशकाची आळवणी झाल्यानंतर 7 ते 8 दिवसांनी जैविक कीडनाशकाचा वापर करावा. या प्रकारच्या कीडनियंत्रणामध्ये दोन प्रकारच्या जैविक कीडनाशकांचा समावेश होतो.
बीव्हीएम (बिव्हेरिया ब्यासियांना) हे व्हीएसआय निर्मित जैविक कीडनाशक 2 लिटर 200 लिटर पाण्यात एकत्र मिसळून उसाच्या बुडख्यात वाफशावेळी आळवणी करावी.
इ.पी.एन. (दुसरी आळवणी) वरील बीव्हीएम या कीडनाशकाची आळवणी झाल्यानंतर 8 ते 10 दिवसांनी इ.पी.एन. व्हीएसआय निर्मित जैविक कीडनाशकाचा वापर करावा. हे जैविक कीडनाशक 1 लिटर 200 लिटर पाण्यात एकत्र मिसळून उसाच्या बुडख्यात वाफशावेळी आळवणी करावी.