पुणे: राज्यातील 36 पैकी 18 जिल्ह्यांत पावसाचे अलर्ट देण्यात आले असून, 22 ते 27 जूनपर्यंत कोकण, मध्य महाराष्ट्र अन् विदर्भात जोर राहणार आहे. मराठवाडा आणि उत्तर महाराष्ट्रात हलक्या पावसाचा अंदाज देण्यात आला आहे. दरम्यान, 23 व 24 जून रोजी कोकण, मध्य महाराष्ट्राला अतिवृष्टीचा इशारा हवामान विभागाच्या दिल्ली मुख्यालयाने दिला आहे.
आगामी चार दिवस राज्यातील 18 जिल्ह्यांना विविध अलर्ट देण्यात आले आहेत. या ठिकाणी हवेचे दाब अनुकूल असल्याने पाऊस पडत आहे. प्रामुख्याने पुणे, कोल्हापूर, सातारा आणि नाशिक घाट माथ्यावर पावसाचा जोर आहे. कोकण, मध्य महाराष्ट्रातील काही जिल्ह्यांना ऑरेंज तर विदर्भाला यलो अलर्ट देण्यात आला आहे. (Latest Pune News)
हे अलर्ट 22 ते 27 जूनपर्यंत असून त्यानंतर पुन्हा पाऊस वाढणार आहे. प्रामुख्याने कोकण, मध्य महाराष्ट्र आणि विदर्भात 23 व 24 जून रोजी मुसळधार ते अतिमुसळधार पावसाचा अंदाज हवामान विभाग दिल्ली मुख्यालयाने दिला आहे.
असे आहेत अलर्ट (22 ते 25 जून)
- ऑरेज अलर्ट: रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, पुणे घाटमाथा, सातारा घाटमाथा.
- यलो अलर्ट: पालघर, ठाणे, मुंबई, सिंधुदुर्ग, नाशिक घाटमाथा, कोल्हापूर घाटमाथा, अकोला, अमरावती, भंडारा, चंद्रपूर, नागपूर, वर्धा, यवतमाळ, गडचिरोली, यवतमाळ.
जिल्ह्यात हलका ते मध्यम पाऊस
शनिवारी पुणे, पिंपरी-चिंचवडसह जिल्ह्यातील बहुतांश भागांत हलका ते मध्यम पावसाने हजेरी लावली. सरासरी 4 ते 20 मिलिमीटर पाऊस झाला. जिल्ह्यात गत पाच दिवसांपासून पाऊस सुरू असून, शनिवारी देखील हलका ते मध्यम पावसाने हजेरी लावली. सर्वाधिक पाऊस गिरिवन 20, भोर 14.5, लवासा 14 मि.मी इतकी नोंद झाली. रविवारी देखील घाटमाथ्याला ऑरेंज अलर्ट दिला आहे. त्यामुळे पालखी मार्गावर मध्यम ते मुसळधार पाऊस राहील, असा अंदाज हवामान विभागाने दिला आहे.