पारगाव: आंबेगाव तालुक्यात गेल्या काही दिवसांपासून पडत असलेल्या जोरदार पावसामुळे ओढे-नाल्यांमधील खेकडे आता रस्त्यावर येऊ लागले आहेत. या खेकड्यांना स्थानिक खवय्यांकडून मोठी मागणी होत आहे.
यंदाचा पावसाळा समाधानकारक ठरला आहे. परतीच्या पावसामुळे धरणे जलमय झाली असून, डिंभे धरण (हुतात्मा बाबू गेनू जलसागर) तब्बल 98 टक्के भरले आहे. यामुळे घोड व मीना नद्यांच्या पात्रात मोठ्या प्रमाणावर पाणी विसर्ग करण्यात आला आहे. (Latest Pune News)
परिणामी, नदीपात्रात मासे, वाम आणि खेकडे विपुल प्रमाणात आढळून येत आहेत. ठिकठिकाणी मच्छीमार मासेमारी करताना दिसत आहेत. रस्त्यालगत खेकड्यांची वर्दळ वाढली असून, खवय्यांसाठी हा ऋतू पर्वणी ठरला आहे.