सोमेश्वरनगर: सोमेश्वरनगर परिसरात गुरुवारी (दि. 22 ) पासून पडत असलेल्या ढगफुटीसदृश पावसामुळे जनजीवन पूर्णपणे विस्कळीत झाले असून, शेती पाण्याखाली गेली आहे. शनिवार, रविवार दिवस-रात्र पडत असलेल्या पावसामुळे अनेकांच्या घरात पाणी शिरून संसारोपयोगी साहित्यांसह धान्याचे मोठे नुकसान झाले आहे. परिसरातील सर्वच ओढे, नाले, विहिरी तुडुंब झाल्या असून, शेतांना तळ्याचे स्वरूप आले आहे.
मुसळधार पावसाने मिरची, टोमॅटो, गवार, कांदा आदी तरकारी पिकांसह ऊसरोपांचेही मोठे नुकसान झाले आहे. शेतकर्यांनी पंचनामा करून नुकसानभरपाई देण्याची मागणी केली आहे. शेतीपिकांत गुडघ्याएवढे पाणी साठले आहे. पुढील महिनाभर तरी शेती मशागतीची कामे होऊ शकणार नाहीत, एवढ्या मोठ्या प्रमाणात पाऊस झाल्याने बळीराजा अडचणीत आला आहे.(Latest Pune News)
मागील 40 वर्षांच्या इतिहासामध्ये प्रथमच मे महिन्यात एवढा पाऊस पडला असल्याचे ज्येष्ठ नागरिकांनी सांगितले. पावसामुळे ग्रामीण भागातील सर्व रस्ते पाण्याखाली गेले आहेत. रस्त्यावरील वाहतूकही तुरळक दिसून आली. अनेकांना घराबाहेरही पडता आले नाही. जनावरांच्या चार्याचाही प्रश्न या पावसाने निर्माण केला आहे.
सततच्या पावसामुळे सोमेश्वर मंदिर परिसरातील तळ्यात पाणीसाठा वाढला आहे. आडसाली ऊसशेती अडचणीत आली असून, 1 जुलैऐवजी 15 जुलैला ऊस लागण करण्याला परवानगी देण्याची मागणी शेतकर्यांनी केली आहे.
सोमेश्वरनगर, मुरुम, वाघळवाडी, वाणेवाडी, होळ, करंजे, करंजेपूल, निंबुत, खंडोबाचीवाडी, गडदरवाडी, सोरटेवाडी, मगरवाडी, सोमेश्वर मंदिर, चौधरवाडी, सदोबाचीवाडी, सस्तेवाडी, आठफाटा या भागांत तसेच वाड्या-वस्त्यांवर ढगफुटीसदृश पाऊस झाला.
नागरिकांच्या घरात शिरले पावसाचे पाणी
सोमेश्वरनगर परिसरातील काही ओढ्यांची आणि चार्यांच्या साफसफाईची गरज आहे. मात्र, जलसंपदा विभाग आणि पदाधिकारी या प्रश्नाकडे दुर्लक्ष करीत असल्याने कित्येक वर्षांपासून कामे न झाल्याने नागरिकांच्या घरात थेट पावसाचे पाणी शिरत आहे. ओढ्यांवर केलेल्या चुकीच्या पुलाच्या कामामुळे घराचे आणि शेतीचे नुकसान झाले आहे. ऐन उन्हाळ्यात पाऊस नको म्हणण्याची वेळ शेतकर्यांवर आली आहे.
डावा कालव्याचे आवर्तन बंद
मुसळधार पावसामुळे निरा खोर्यातील धरणक्षेत्रात पाणीसाठा वाढला आहे. पावसामुळे निरा डावा कालव्याचे आवर्तन बंद करण्याचा निर्णय जलसंपदा विभागाने घेतला. सोरटेवाडी, कर्चेवाडी, पवारवस्ती, कुलकर्णीवस्ती, शेंडकरवाडी, साळोबावस्ती, कारंडेमळा परिसरातील नागरिकांच्या घरात पाणी शिरले. पावसाच्या पाण्याने धान्यासह इतर वस्तूंचे मोठे नुकसान झाले आहे.