Heavy rains in Baramati
बारामती: बारामती शहर व तालुक्यात गेल्या पाच दिवसांपासून सुरू असलेल्या पावसाचा उद्रेक थांबायला तयार नाही. रविवारी (दि. 25) देखील पावसाचा जोर कायम होता. गेल्या अनेक वर्षांत मे महिन्यात असा पाऊस शहर व तालुक्यात झाला नव्हता.
ऐन उन्हाळ्यात पावसाचे थैमान सुरू आहे. अनेकांच्या घरांत पावसाचे पाणी शिरले. पिके पाण्याखाली गेल्याने शेतकर्यांचे फार मोठे नुकसान झाले. शहरातील रस्ते जलमय झाले असून, मोठ्या मैदानांना तळ्याचे स्वरूप आले आहे. (Latest Pune News)
जोरदार पावसामुळे बारामती शहरातील अनेक रस्ते जलमय झाले आहेत. रस्त्यांवर मोठ्या प्रमाणात पाणी साठले आहे. त्यातून मार्ग काढताना वाहनचालकांची तारांबळ होत आहे. शहरातील फलटण रस्ता व अन्य काही भागांत पावसाचे पाणी पुराप्रमाणे वाहत आहे. काही ठिकाणी ते नागरिकांच्या घरात घुसले.
परिणामी, संसारोपयोगी साहित्य भिजून मोठे नुकसान झाले. शहरातील जलशुद्धीकरण केंद्र परिसरात अनेक इमारती उभ्या राहिल्या आहेत. या भागात जाण्यासाठी पक्का डांबरी रस्ता नाही. हा रस्ता पाण्याखाली गेला आहे. नागरिकांचे येणे-जाणेच पावसाने बंद केले आहे.
शहरासह तालुक्यात स्थिती कायम आहे. परिणामी, नागरिकांना घराबाहेर पडणे मुश्कील झाले आहे. तालुक्यातील ओढे-नाले तुडुंब भरून वाहू लागले आहेत. मे महिन्यामध्ये अशी परिस्थिती निर्माण होण्याची ही पहिलीच वेळ आहे. एरवी ओढे-नाले तुडुंब भरून वाहण्यासाठी 15 ऑगस्टची वाट पाहावी लागते. यंदा मात्र मेमध्येच ओढे वाहू लागले आहेत.
शहरात विजेचा खेळखंडोबा सुरू आहे. अनेक भागांत भूमिगत वाहिन्या तुटल्या आहेत. महावितरण व नगरपरिषद कर्मचारी, स्थानिक नागरिकांच्या मदतीने बिघाड दुरुस्त करून वीजपुरवठा पूर्ववत करीत आहेत.
शेतमालाचे मोठे नुकसान
पावसाचा मोठा परिणाम पिकांवर झाला आहे. प्रचंड प्रमाणात कोसळत असलेल्या पावसामुळे तरकारी पिके गुडघाभर पाण्यात आहेत. मेथी, कोथिंबीर, शेपू व अन्य भाजीपाल्यांचे अपरिमित नुकसान झाले आहे. टॉमटोच्या बागा पाण्यात आहेत. कोबी, फ्लॉवर, गवार, मिरची, भेंडी, कारली, वांगी, दोडक्याचे नुकसान झाले आहे. त्यामुळे फळभाज्या, भाजीपाल्यांचे भाव कडाडण्याची शक्यता आहे.
नगरपरिषदेकडून निवार्याची व्यवस्था
बारामती नगरपरिषद हद्दीत अनेक नागरिकांच्या घरांत पावसाचे पाणी शिरले आहे. परिणामी, त्यांच्या राहण्याचा प्रश्न निर्माण झाला आहे. पालिकेने अशा नागरिकांची राहण्याची व्यवस्था विविध भागांत केली आहे. संपर्क अधिकार्यांचे संपर्क क्रमांकही मुख्याधिकारी पंकज भुसे यांनी जाहीर केले आहेत.
शहरात जळोची भीमनगर समाजमंदिर, जळोची जिल्हा परिषद शाळा, तांदूळवाडी क्षेत्रीय कार्यालय, तांदूळवाडी जिल्हा परिषद शाळा, रुई क्षेत्रीय कार्यालय, शाळा क्रमांक 1 कदम चौक, शाळा क्र. 2 कसबा, शाळा क्रमांक 5 व 7 शारदा प्रांगण, पंचशीलनगर समाजमंदिर कसबा, माता रमाई भवन आमराई या ठिकाणी या नागरिकांच्या निवार्याची व्यवस्था क?ण्यात आली आहे.
प्रशासनाशी संपर्क साधा
बारामती तालुक्यात शनिवारअखेर 226 मिलिमीटर पावसाची नोंद झाली. गेल्या 24 तासांपासूनही पाऊस कोसळतोच आहे. नागरिकांनी नदीपात्र, कालवा परिसरात जाऊ नये. अत्यावश्यक कामांशिवाय घराबाहेर पडू नये. प्रशासनास सहकार्य करावे. आपत्कालीन परिस्थितीत प्रशासनाशी संपर्क साधावा, असे आवाहन तहसीलदार गणेश शिंदे यांनी केले आहे.
दुग्धोत्पादनावर परिणाम
पावसामुळे शेतात जाऊन चारा आणावा अशीही स्थिती नाही. परिणामी, आहे तीच वैरण आणि चारा जनावरांना द्यावा लागत आहे. गोठ्यातील जनावरे गारठली आहेत. दुग्धोत्पादनावर त्याचा परिणाम झाला आहे.