खडकवासला उजवा व निरा डावा कालव्याला भगदाड Pudhari
पुणे

Heavy Rain: खडकवासला उजवा व निरा डावा कालव्याला भगदाड

ढगफुटीसदृश पावसाचा परिणाम; ओढ्यालगतच्या घरांमध्ये शिरले पाणी

पुढारी वृत्तसेवा

भवानीनगर: इंदापूर तालुक्याच्या पश्चिम भागात रविवारी (दि. 25) ढगफुटीसदृश पाऊस झाला असून, या पावसामुळे निरा डावा कालवा व खडकवासला उजवा कालव्याला भगदाड पडून मोठ्या प्रमाणात पाणी ओढ्याला वाहून गेले.

इंदापूर तालुक्याच्या पश्चिम भागात सणसर, भवानीनगर, काझड, शिंदेवाडी, निंबोडी, लाकडी, अकोले, निरगुडे या परिसरामध्ये रविवारी सकाळपासूनच जोरदार पावसाला सुरुवात झाली होती. निरा डावा व खडकवासला उजवा या दोन्ही कालव्यांना आवर्तन सुरू होते. (Latest Pune News)

अशा परिस्थितीत ढगफुटीसदृश पावसामुळे कालव्यातील पाण्याच्या पातळीत वाढ झाली. त्यानंतर कालव्यातून पाणी बाहेर आल्याने रायतेमळा येथे ओढ्याजवळ निरा डावा कालव्याला घळ पडला व हळूहळू कालव्यातून मोठ्या प्रमाणात पाणी वाहू लागले. त्यामुळे त्या ठिकाणी मोठे भगदाड पडले.

तसेच, खडकवासला उजवा कालव्याला निरगुडे येथे भगदाड पडून मोठ्या प्रमाणात पाणी ओढ्याला वाहून गेले. याबाबत माहिती मिळताच जलसंपदा विभागाच्या अधिकार्‍यांनी वरील वितरिकांना कालव्याचे पाणी सोडून दिले. त्यामुळे भगदाड पडलेल्या ठिकाणचे पाणी बंद होण्यास मदत झाली.

मे महिन्यामध्ये एवढ्या मोठ्या प्रमाणात पाऊस पडण्याची ही अनेक वर्षांतील पहिलीच घटना असल्याचे ग्रामस्थांमधून बोलले जात आहे. ढगफुटीसदृश पावसामुळे शेतकर्‍यांनी केलेल्या उसाच्या लागणीमध्ये मोठ्या प्रमाणात पाणी साचले. ओढ्यालगतच्या उसाच्या लागणी पाण्यात बुडून गेल्या आहेत. तसेच काझड, सणसर व भवानीनगर येथील ओढ्यालागतच्या ग्रामस्थांच्या घरांमध्ये पाणी जाऊन जीवनावश्यक वस्तूंचे नुकसान झाले.

शेतकर्‍यांना ओल्या दुष्काळाची भीती

तालुक्याच्या पश्चिम भागामध्ये मागील आठ दिवसांपासून होत असलेल्या पावसामुळे ओल्या दुष्काळाची परिस्थिती निर्माण झाली आहे. खडकवासला उजवा कालव्याला भगदाड पडल्याची माहिती येथील विजय काळे यांनी ग्रामस्थांना दिली. त्यामुळे ग्रामस्थ सतर्क झाले.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT