परतीच्या पावसाने जिल्ह्यात दैना; काही ठिकाणी अतिवृष्टी Pudhari
पुणे

Pune Rain: परतीच्या पावसाने जिल्ह्यात दैना; काही ठिकाणी अतिवृष्टी

शहरासह पिंपरी-चिंचवडमध्ये जोरदार सरी; 16 धरणांतून विसर्ग

पुढारी वृत्तसेवा

Heavy rain in Pune district

पुणे: जिल्ह्याच्या बहुतांश ग्रामीण भागात दोन दिवस मुसळधार पावसाने थैमान घातल्याने जनजीवन विस्कळीत झाले आहे. रविवारी दुपारपासून सुरू झालेल्या पावसामुळे अनेक ठिकाणी पूरस्थिती निर्माण झाली. सणसरमध्ये तब्बल 480 नागरिक अडकले होते.

मात्र, त्यांची सुटका करण्यात आली. हवेली तालुक्यात अतिवृष्टी होत तेथे 180 मि.मी. पावसाची नोंद झाली. दरम्यान, ग्रामीण भागासह पुणे शहर आणि पिंपरी-चिंचवड परिसरातही पावसाच्या जोरदार सरी कोसळल्या. गेल्या 12 तासांत झालेला पाऊस या हंगामातील सर्वांत मोठा पाऊस ठरला.  (Latest Pune News)

पावसाच्या संततधारेमुळे पाण्याची आवक वाढल्याने जिल्ह्यातील सोळा धरणांतून पाण्याचा विसर्ग सुरू करण्यात आल्याची माहिती प्रशासनाने दिली आहे.

ग्रामीण भागात धुवांधार

जिल्ह्याच्या ग्रामीण भागात दोन दिवसांपासून मूसळधार पाऊस सुरू आहे. परिणामी खडकवासला धरण साखळी, कुकडी प्रकल्प तसेच निरा खोऱ्यातील धरणांतूनही मोठ्या प्रमाणावर विसर्ग सोडण्यात आल्याने मुळा-मुठा, निरा, भीमा, भामा, आरळा, वेळ, इंद्रायणी आदी प्रमुख नद्या, ओढे-नाले, तलाव तुडुंब भरले आहेत. उजनी जलाशयातून देखील मोठ्या प्रमाणावर पाणी सोडण्यात आले आहे. अनेक गावांत पूरजन्य स्थिती निर्माण झाली होती, तर काही गावांचा संपर्कदेखील तुटला होता.

अनेक पुलांवर पाणी आल्यामुळे वाहतूक ठप्प झाली आहे. काही गावांतील पुलांचे भराव, शेतरस्ते, शेतीचे बांध वाहून गेले आहेत. शेतशिवार पाण्याखाली गेले आहेत. भात, सोयाबीन, बाजरी, मका, कांदा, भाजीपाला आणि ऊस यांसारखी पिके पाण्याखाली गेल्याने शेतकऱ्यांचे मोठे आर्थिक नुकसान झाले आहे.

मुख्य बाजारपेठा आणि अंतर्गत रस्त्यांनाही तळ्याचे स्वरूप आले आहे. काही गावांत विजेचे खांब पडल्यामुळे वीजपुरवठा खंडित झाला होता. नागरिक आणि शेतकरी या मुसळधार पावसाने हवालदिल झाले आहेत. स्थानिक प्रशासनाने तातडीने प्रभावित भागांची पाहणी करून मदत पोहचवावी, अशी शेतकऱ्यांनी मागणी केली आहे.

पुणे शहरात संततधार

रविवारी रात्री झालेल्या संततधार पावसामुळे शहरातील अनेक भागांत अडचणी निर्माण झाल्या. 14 ठिकाणी रस्त्यावर पाणी साचले, तर 12 ठिकाणी झाडे कोसळण्याच्या घटना घडल्या. धानोरी, विमाननगर आणि टिंगरेनगर या भागांत पाणी साचल्याचे प्रमाण अधिक होते. रविवारी सकाळपासूनच पावसाच्या सरी सुरू होत्या. मात्र, संध्याकाळनंतर संततधार पाऊस सुरू झाला आणि तो रात्रभर कोसळत राहिला. बावधन, हडपसर मांजरी, विठ्ठलनगर, हडपसर, सिंहगड रस्ता, वाघोली आदी ठिकाणी ठिकाणी पाणी साचले होते.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT