लोणी-धामणी: गेल्या दहा दिवसांपासून सुरू असलेल्या अवकाळी व सततच्या पावसाने शिरदाळे (ता. आंबेगाव) परिसरातील हातातोंडाशी आलेली पिके धोक्यात आली आहेत. बटाटा, सोयाबीन, मका, ज्वारी, कडधान्य या पिकांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान होण्याची भीती निर्माण झाली असून, शेतकरी चिंतेत सापडले आहेत.
एकेकाळी ‘बटाट्याचे आगार’ म्हणून ओळख असलेल्या शिरदाळे गावात बटाट्याची लागवड दिवसेंदिवस घटत चालली आहे. मोठा खर्च, मजुरांचा तुटवडा, खतांचे वाढलेले दर, अनियमित पावसाचे चक्र व बाजारभावातील चढ-उतार यामुळे शेतकऱ्यांची अडचण वाढली आहे. यावर्षी काही शेतकऱ्यांनी मर्यादित प्रमाणात लागवड केली होती. (Latest Pune News)
पीक चांगले उभे राहिले होते; मात्र काढणीला सुरुवात होताच पावसाने हजेरी लावल्याने बटाटा अक्षरशः पाण्यात पोहत असल्याचे बटाटा उत्पादक शेतकरी आणि शरद बँकेचे संचालक अशोक आदक पाटील, बाबाजी चौधरी, राघू रणपिसे, नानाभाऊ रणपिसे, बाळासाहेब तांबे या शेतकऱ्यांनी सांगितले.
सोयाबीन अंतिम टप्प्यात आले असून, सततच्या पावसामुळे त्याला मोड येण्यास सुरुवात झाली आहे. ज्वारीही पिवळी पडू लागली आहे. मूग-उडिदाचे उत्पादन निम्म्यावर आले असून, वाटाणा पिकाला थोडाफार फायदा झाला आहे; परंतु पाऊस थांबला नाही तर तेही पाण्यात जाण्याची भीती कांताराम तांबे, संदीप मिंडे, कोंडीभाऊ तांबे, मच्छिंद्र चौधरी, सुभाष तांबे, केरभाऊ तांबे, शिवाजी सरडे यांनी व्यक्त केली आहे.
या परिस्थितीत शेतकरी हतबल झाले असून, शाश्वत पर्यायाची मागणी तीव होत आहे. सरपंच सुप्रिया मनोज तांबे, उपसरपंच बिपीन चौधरी, माजी सरपंच वंदना तांबे, माजी उपसरपंच मयूर सरडे, माजी सरपंच जयश्री संतोष तांबे यांनी सांगितले की, ‘शासनाने तातडीने मदत करावी. गावाला शेतीपूरक उद्योग मिळावा यासाठी आम्ही मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्र्यांची भेट घेणार आहोत. माजी मंत्री दिलीपराव वळसे पाटीलयांच्या माध्यमातून हा प्रश्न मांडण्याचा आमचा निर्धार आहे.’