पुणे: मान्सून हिमालयाच्या पायथ्याशी स्थिर झाल्याने आता चांगल्या पावसाला सुरुवात होत आहे. कोकण, विदर्भात 22 ते 27 तर मध्य महाराष्ट्रात 24 व 25 रोजी मुसळधारेचा इशारा देण्यात आला आहे. मान्सून जेव्हा हिमालयाच्या पायथ्याला स्थिर होतो तेव्हा तो देशभर चांगला पाऊस पडण्यास सुरुवात होते.
अशी स्थिती गत चोवीस तासांत तयार झाल्याने राज्यात मंगळवार 22 जुलैपासून चांगल्या पावसाला सुरुवात होत आहे. कोकणात 27 जुलै, विदर्भात 23 ते 26 जुलैदरम्यान मुसळधार ते अतिमुसळधार तर मध्य महाराष्ट्रात 24 आणि 25 रोजी मुसळधार पावसाचा अंदाज हवामान विभागाने दिला आहे. (Latest Pune News)
पुढील 5 ते 7 दिवसांत केरळ, कर्नाटक, आंध्र प्रदेश, तेलंगण, कोकण आणि गोवा, मध्य महाराष्ट्र आणि छत्तीसगडमध्ये मुसळधार ते अतिमुसळधार पाऊस पडण्याची शक्यता आहे.
अनेक राज्यांत पूरस्थिती गंभीर
उत्तर भारतात मुसळधार पावसाने थैमान घातले असून, हिमाचल प्रदेश, जम्मू-काश्मीर, राजस्थान, बिहार, छत्तीसगड आणि उत्तर प्रदेशात जनजीवन विस्कळीत झाले आहे. हिमाचल प्रदेशात दरड कोसळून एका नवविवाहित जोडप्याचा दुर्दैवी मृत्यू झाला, तर वैष्णोदेवीच्या मार्गावर झालेल्या भूस्खलनात अनेक भाविक जखमी झाले आहेत.
अनेक ठिकाणी शाळांना सुट्ट्या जाहीर केल्या असून, नद्यांनी धोक्याची पातळी ओलांडल्याने पूरस्थिती निर्माण झाली आहे. मुसळधार पावसामुळे सिमला-नालागढ रस्त्यावर जठिया देवी येथे आणि वाकनाघाट-ममलीग मार्गावर भूस्खलन झाले आहे.