

पुणे : कोंढ्यातील कुरिअर बॉय कथीत बलात्कार प्रकरणात पोलिसांनी तक्रारदार तरुणीवर गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू केली आहे. तिच्यावर सद्या अदखलपात्र गुह्याची नोंद कोंढवा पोलिस ठाण्यात करण्यात आली असून, दखलपात्र गुन्हा दाखल करण्याची परवानगी न्यायालयाकडे मागण्यात आल्याचे वरिष्ठ पोलिस अधिकार्यांनी सांगितले. त्यामुळे संबंधीत तरुणीच्या अडचणीत वाढ होण्याची शक्यता वर्तवली जाते आहे.
कुरिअर बॉय म्हणून घरी आलेल्या तरुणाने स्प्रे मारुन आपल्याला बेशुद्ध केले. त्यानंतर त्याने आपल्यावर अत्याचार केल्याचा तरुणीने आरोप केला होता. या प्रकारामुळे शहरात एकच खळबळ उडाली होती. दरम्यान, पोलिस तपासात हा सर्व बनाव या तरुणीनेच घडवून आणल्याचे समोर आले. कुरिअर बॉय दुसरा -तिसरा कोणी नसून तो तिचा मित्र असून एक वर्षांपासून ते एकमेकांना ओळख होते. तो गेल्यानंतर या तरुणीने त्याच्याबरोबर काढलेला फोटो एडिट करुन त्यावर पुन्हा येईन, असे लिहिल्याचे तपासात निष्पन्न झाले. त्यामुळे कोंढवा पोलिसांनी या तरुणीवर खोटा पुरावा तयार करुन पोलिस अधिकाऱ्यांची दिशाभूल करणे, आपण देत असल्याची माहिती खोटी असल्याचे माहिती असताना सुद्धा पोलिस आणि ससून रुग्णालयातील वैद्यकीय अधिकार्यांना खोटी माहिती दिल्याप्रकरणी अदखलपात्र गुन्ह्याची नोंद केली आहे. तिने हा सर्व प्रकार का केला? हे मात्र ती काही सांगत नाही.
कोंढव्यात २ जुलै रोजी सायंकाळी साडेसात वाजता आपल्यावर अत्याचार झाल्याचा दावा या तरुणीने केला होता. सायंकाळी साडेसात वाजण्याच्या सुमारास एक अनोळखी व्यक्ती आली. त्याने तरुणीला तुमचे कुरिअर आले आहे. माझ्याकडे पेन नाही़ पेन आणता का? असे म्हणाला. मी पेन आणायला वळल्यावर तो मागे आला व त्यानंतर तरुणीला काहीच कळले नाही. त्यानंतर तिला रात्री 8 वाजून 35 मिनिटांनी जाग आली. तेव्हा तिच्या अंगावर अर्धवट कपडे होते. तिने मोबाईल अनलॉक करुन पाहिला असता मोबाईलच्या स्क्रिनवर कुरिअर घेऊन आलेल्या व्यक्तीसोबतचा अश्लिल अवस्थेतील फोटो दिसला. त्या फोटोवर आज अक्षेपार्ह असा मजकूर लिहला होता. हे कोणाला सांगितले तर सर्व फोटो लिक करेन, पुन्हा येईन तयार रहा, असे लिहिले होते. मोबाईलमध्ये दोन फोटो दिसत होते. तिच्या सांगण्यावरुन पोलिसांनी ३ जुलै ला गुन्हा दाखल केला.
पाचशेपेक्षा अधिक कर्मचारी अधिकारी या तपासात गुंतले होते. तब्बल अडीचशे पेक्षा अधिक कॅमेर्यांची पाहणी पोलिसांनी केली. तपासात तरुणीच्या मोबाईलमधील मॅसेज पाहिले असता तिनेच आरोपीस (मित्राला) घरी येण्याची परवानगी दिली होती. १ जुलै रोजी केलेल्या व्हॉटसअॅप चॅटप्रमाणे तरुणीने आरोपीस घरी कोणी नसताना येण्याबाबत सुचविले होते. तसेच येण्याच्या मार्गाबाबत पूर्वीप्रमाणेच ये, असे सांगितले. त्यावरुन आरोपी हा कुरियर बॉय नसून तो फिर्यादीचा मित्र असल्याचे पोलिसांनी निष्पन्न केले. ससून रुग्णालयातील डॉक्टरांनाही तिने आपल्या तोंडावर स्प्रे मारल्याचे खोटे सांगितले. तरुणीने घटना घडल्यानंतर रात्री ८ वाजून ३५ मिनिटांनी शुद्धीवर आल्यावर स्वत:चा फोन हातात घेऊन पाहिला, असे तक्रारीत नमूद केले. मात्र प्रत्यक्षात अश्लिल फोटो आरोपीने तरुणीच्या मोबाईलवरुन तिच्या संमतीने २ जुलै ला रात्री ७ वाजून ५३ मिनिटांनी काढलेले होते.
आरोपी हा सोसायटीचे लिफ्टमधून ग्राऊंड फ्लोअरला येऊन मेनगेटमधून ८ वाजून २७ मिनिटांनी बाहेर पडल्याचे स्पष्ट झाले आहे. परंतु तरुणीने फोनवरुन काढण्यात आलेला फोटो हा ८ वाजून २७ मिनिटांनी एडिट करुन त्यावर मेसेज टाईप केलेला आहे. हा मेसेज तरुणीने स्वत:च टाईप केला असल्याचे निष्पन्न झाले आहे. तरुणीच्या मोबाईलमधील डाटा रिकव्हर केला असता त्यामध्ये तरुणीने आरोपी सोबतचा काढलेला मुळ फोटो ज्यामध्ये दोघांचाही चेहरा स्पष्ट दिसत आहे. तो मिळून आला आहे. तो फोटो तरुणीने स्वत: क्रॉप व एडिट करुन त्यात आरोपीचा चेहरा दिसू नये, त्याद्वारे तपासामध्ये संदिग्धता निर्माण व्हावी, म्हणून त्यात फेरबदल करुन मोबाईलवर ठेवला आहे. तिने तिचा मोबाईल पोलिसांना तपासासाठी देण्याचे पूर्वी मुळ फोटो डिलिट केले आहेत. आरोपीची ओळख पटू नये, म्हणून स्वत:च्या मोबाईलमध्ये फोटो एडिट करुन ठेवले. मुळ फोटो डिलिट केले. सीसीटीव्हीमधील आरोपीचा फोटो दाखविल्यावर तरूणीने त्याला ओळखत नसल्याचे सांगितले.
पोलिसांच्या तपासादरम्यान सीसीटीव्ही फुटेज पाहिल्यानंतर या व्यक्तीचा शोध पोलिसांनी लावला. तरुणीने केलेले कृत्य हे तिने हेतुपुरस्सर व जाणिवपूर्वक केल्याचे तपासादरम्यान स्पष्ट झाले. त्यामुळे कोंढवा पोलिसांनी खोटी माहिती देणे, खोटे पुरावे तयार करणे, त्याचा वापर करुन पोलिसांना अधिकाराचा गैरवापर करण्यास प्रवृत्त करणे, अशा कलमाखाली तरूणीवर अदखपात्र गुन्ह्याची नोंद केली आहे. याबाबत न्यायालयाच्या परवानगीने पुढील तपास करण्यात येणार आहे.