Heavy rain alert in Pune and ghat areas till Thursday
पुणे: पुणे शहर, पिंपरी-चिंचवडसह जिल्ह्यात सोमवारी (दि. 18) संततधार पावसाने बहार आणली. घाटमाथ्यावर अतिवृष्टी, शहरात संततधार, तर जिल्ह्यात हलका ते मध्यम स्वरूपाच्या पावसाने हजेरी लावली. जिल्ह्यात लवळे 37, गिरिवन 32.5, पुणे शहरात सरासरी 29.7, तर पिंपरी-चिंचवड भागात 29 मि. मी. पावसाची नोंद झाली. दरम्यान, घाटमाथ्यावर गुरुवार (दि. 21 ऑगस्ट) पर्यंत ऑरेंज अलर्ट दिल्याने जिल्ह्यात मध्यम पावसाचा अंदाज आहे.
सोमवारी जिल्ह्यात सर्वत्र पावसाने चांगली हजेरी लावली. पुणे शहरात पहाटेपासूनच पावसाला सुरुवात झाली. सायंकाळी 6 वाजता पाऊस थांबला. मात्र, शहराला दाट ढगांनी वेढले. संततधार पावसामुळे कमालीचा गारवा निर्माण झाला आहे. बहुतांश भागांतील रस्त्यांवर चिखल आणि पाणी साचल्याने रेल्वे अन् बसस्थानकांवर प्रवाशांची तारांबळ उडाली. (Latest Pune News)
पिंपरी-चिंचवड शहरासह उपनगर आणि मावळ तालुक्यात सोमवारी (दि. 18) पावसाने जोरदार हजेरी लावली. यामुळे शहरातील सखोल भागांत पाणी साचले होते. वल्लभनगर भुयारी मार्गात तसेच शंकरवाडी पुलाखाली मोठ्या प्रमाणात पाणी साचले होते. त्यामुळे
पाण्यातून वाट काढताना वाहनचालकांना कसरत करावी लागली. मावळात पावसामुळे अनेक ठिकाणी वाहतूक मंदावली होती. मध्येच पावसाचा जोर वाढत असल्याने नागरिक रेनकोट व छत्री असूनही अर्धेनिम्मे भिजले होते.
पावसामुळे शहरातील रस्त्यांची दुरवस्था झाली असून, चिंचवडगावातील बसस्थानकापासून एल्प्रो मॉलकडून लिंक रोडकडे जाणार्या चौकातील रस्त्यावर ठिकठिकाणी खड्डे पडले आहेत. तालुक्यातील देहूगाव, पवनानगर, तळेगाव परिसरातही पावसाने हजेरी लावली. पवना धरण परिसरात झालेल्या मुसळधार पावसामुळे धरण 98 टक्के भरले आहे.
दक्षिण जिल्ह्यात रिमझिम; उत्तरला प्रतीक्षा कायम
जिल्ह्यातील अनेक तालुक्यांत सोमवारी (दि. 18) रिमझिम आणि संततधार पावसाने हजेरी लावली. या पावसाने खरीपातील पिकांसह उसालाही दिलासा मिळाला आहे. त्यामुळे दक्षिण जिल्ह्यातील शेतकर्यांनी समाधान व्यक्त केले.
गेल्या काही दिवसांपासून जिल्ह्यातील शेतकर्यांना पावसाची प्रतिक्षा होती. खरीप हंगामील पिकांना उभारी येण्यासाठी पावसाची मोठी गरज होती. मात्र दिवसभर फक्त ढगाळ वातावरण होत असल्याने शेतकर्यांमध्ये चिंतेचे वातावरण निर्माण झाले होते. त्यामुळे यंदाचा श्रावण कोरडा जाणार की काय, अशीच स्थिती निर्माण झाली होती.
मात्र सोमवारी दिवसभर जिल्ह्यातील बारामती, दौंड, हवेली, वेल्हे, भोर तालुक्यांत संततधार पावसाने हजेरी लावली. तसेच शिरूर, पुरंदरमध्ये पावसाची प्रतीक्षा कायम आहे. तर उत्तर जिल्ह्यातील जुन्नर, आंबेगाव, खेडमधील डोंगरी भागात मुसळधार पाऊस पडला. मात्र इतर ठिकाणी तुरळक पाऊस झाला.
दरम्यान, जिल्ह्यात पावसाने दीर्घ दडी मारली होती. धरण क्षेत्रातही पाऊस पडत नसल्याने पाण्याचा विसर्ग बंद करण्यात आला होता. त्यामुळे ऐन पावसाळ्यात जिल्ह्याच्या दक्षिण भागातील तालुक्यातील पिकांना पाणी देण्यासाठी शेतकर्यांवर धडपड करण्याची वेळ आली होती. त्यातच उत्तर जिल्ह्यातील धरणांतील पाणीसाठा वाढण्यासाठी मोठ्या पावासाची गरज आहे.