पुणे; पुढारी वृत्तसेवा : 'गणपती बाप्पा मोरया, पुढच्या वर्षी लवकर या', 'गणपती गेले गावाला, चैन पडेना आम्हाला…' या जयघोषात सोमवारी (दि. 25) सात दिवसांच्या बाप्पाला निरोप देण्यात आला. सोमवारी दुपारनंतर सात दिवसांच्या श्रींच्या मूर्तीचे विसर्जन करण्यासाठी भाविकांची पावले नदीपात्राकडे वळत होती. त्यामुळे मुठा नदीपात्र तसेच घाट परिसर भाविकांच्या गर्दीने फुलून गेला होता.
मोरया रे… बाप्पा मोरया रे… चा जयघोष रस्त्यारस्त्यांवर ऐकू येत होता.
घाटावर ठेवण्यात आलेल्या टेबलावर आरती करून प्रसाद वाटून मोरयाच्या गजरात बाप्पांचे मुठा नदीपात्रात तसेच हौदात विसर्जन करण्यात येत होते. विसर्जनादरम्यान अनुचित घटना घडू नये, यासाठी अग्निशमन दलातर्फे प्रमुख विसर्जन घाटांवर जवान आणि खासगी जीवरक्षक तैनात करण्यात आले होते. मुठा नदीपात्रासह विविध ठिकाणी तयार करण्यात आलेल्या लोखंडी टाक्या तसेच हौदात लाडक्या बाप्पांचे विसर्जन सुरू होते.
बहुतांश नागरिकांनी हौदातील पाण्यातच श्रींच्या मूर्तीचे विसर्जन करणे पसंत केले. शहरास उपनगरांतही रात्री उशिरापर्यंत गणेश विसर्जन सुरू होते. सात दिवसांच्या बाप्पाला सोमवारी भाविकांनी जड अंतःकरणाने भावपूर्ण निरोप दिला. घाटावर 'गणपती बाप्पा मोरया, पुढच्या वर्षी लवकर या' असा जयघोष करीत गणेशमूर्तीचे विसर्जन करताना गणेशभक्त.
हेही वाचा