पुणे

पिंपरी : महिनाभरात डेंग्यू संशयित रुग्णसंख्या चौपट

अमृता चौगुले

दीपेश सुराणा

पिंपरी(पुणे) : वातावरणातील बदलामुळे आणि पावसाळा सुरू झाल्याने डेंग्यूच्या संशयित रुग्णसंख्येमध्ये वाढ झाली आहे. गेल्या महिनाभरात संशयित रुग्णांच्या संख्येत चौपट वाढ झाली आहे. मे महिन्यात डेंग्यूचे 100 संशयित रुग्ण आढळले असताना जूनमध्ये जवळपास 472 संशयित रुग्ण आढळले आहेत. दरम्यान, वैद्यकीय विभागाकडील आकडेवारीनुसार अद्याप एकाही रुग्णाला लागण झालेली नाही. तथापि, हिवतापाची लागण झालेले 4 रुग्ण जूनमध्ये आढळून आले आहेत.

चिकूनगुणियाची साथ नियंत्रणात

चिकूनगुणियाची साथ सध्या नियंत्रणात आहे. जानेवारी आणि फेब्रुवारी महिन्यात डेंग्यूचे प्रत्येकी 2 संशयित रुग्ण आढळून आले होते. त्यानंतर मार्च, एप्रिल, मे आणि जून अशा चार महिन्यांमध्ये मात्र एकही रुग्ण आढळून आलेला नाही.

वातावरण बदलाचा परिणाम

जून महिन्याच्या मध्यापर्यंत पाऊस पडला नव्हता. महिन्याच्या अखेरीस पावसाला सुरुवात झाली. सध्या गेल्या काही दिवसांपासून रिमझिम पाऊस सुरू आहे. दिवसभरात अधूनमधून पावसाच्या सरी कोसळत आहेत. वातावरण बदलामुळे डेंग्यूच्या संशयित रुग्णांमध्ये मोठी वाढ झाली असल्याचे चित्र पाहण्यास मिळत आहे.

डासोत्त्पत्ती स्थानके नष्ट करावीत

हिवताप हा आजार एनॉफिलस तर, डेंग्यू आणि चिकुनगुणिया हे आजार पसरविण्यासाठी एडिस इजिप्ताय हे डास कारणीभूत ठरतात. त्यामुळे या आजारांना अटकाव करण्यासाठी एनॉफिलस व एडिस डासांच्या उत्पत्तीवर आळा घालणे गरजेचे आहे.

मे महिन्यापासून संशयित रुग्णसंख्या वाढली

मार्च आणि एप्रिल महिन्यात डेंग्यूच्या रुग्णांची संख्या नियंत्रणात होती. मार्चमध्ये 51 तर, एप्रिल महिन्यात 88 संशयित रुग्ण आढळले होते. त्या तुलनेत मे महिन्यात मात्र संशयित रुग्ण संख्येत वाढ झाली. मे महिन्यामध्ये 100 संशयित रुग्ण आढळून आले. तर, जून महिन्यात या रुग्णसंख्येमध्ये चौपटीपेक्षा अधिक वाढ झाली आहे. सध्या डेंग्यूचे 472 संशयित रुग्ण आढळले आहेत.

हिवतापाचीही साथ

हिवतापाची (मलेरिया) फेब्रुवारी महिन्यात एका रुग्णाला लागण झाली होती. तर, मे महिन्यात हिवतापाचे 3 रुग्ण आढळून आले होते. त्यामध्ये जून महिन्यात एका रुग्णसंख्येने वाढ झाली आहे. जूनमध्ये एकूण 4 रुग्णांना हिवतापाची लागण झाल्याची नोंद आहे.

डासउत्त्पत्ती नियंत्रणासाठी काय काळजी घ्याल ?

  • घरामध्ये पाणी साठविण्याची सर्व भांडी पाणी वापरुन रिकामी केल्यानंतर घासून, कोरडी करा. त्यानंतर त्यामध्ये पुन्हा पाणी भरा.
  • घरातील मोठ्या पाण्याच्या टाक्या ज्या रिकाम्या करणे शक्य नाहीत त्यांना घट्ट झाकण बसवावे.
  • घरातील फ्लॉवरपॉट, कुलर व फ्रिजखालील ट्रे मधील पाणी दर आठवड्याला रिकामे करा.
  • घराच्या मागच्या अंगणात किंवा गच्चीवर असलेल्या भंगार मालाची विल्हेवाट लावा.
  • घराभोवती पाण्याची डबकी असतील तर ती बुजवावी. तसेच, त्या ठिकाणी पाणी वाहते केले जाईल, अशी दक्षता घ्यावी.

हेही वाचा

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT