जयदीप जाधव
उरुळी कांचन : जिल्हा परिषद व पंचायत समितीच्या सार्वत्रिक निवडणुकीच्या तयारीचा वेग अंतिम टप्प्यात आला आहे. या तयारीत सत्ताधारी राजकीय पक्षांनी विकासकामांचे उद्घाटन अथवा विकासाच्या मुद्द्यावर स्थानिक स्वराज्य संस्थांची निवडणूक लढणे अपेक्षित असताना हवेलीत विकासाचा पॅटर्न मात्र विकासकामे व मूलभूत समस्यांपेक्षा तालुक्यात आता मतदारांना ’मौजमजा’ घडविण्यात सत्ताधारी कामाला लागले आहेत. इच्छुकांनी मतदारांची हौस भागविण्यासाठी देवदर्शनवारी तसेच पर्यटनवारीवर लक्ष केंद्रित केले.हा बदलता पॅटर्न सामान्य नागरिकांच्या प्रश्नांच्या मुळावर आला आहे.(Latest Pune News)
हवेली तालुक्यात निवडणुकीत निवडून येणे, हा निकष आता मतदारांची हौस पुरवून घेणे, हा नवीन पायंडा पडला आहे. हा निष्कर्ष गेल्या काही निवडणुकीत फळास आल्याने यंदा देखील इच्छुकांनी हाच पॅटर्न चालू ठेवण्याचा मनसुबा आखला आहे. स्थानिक स्वराज्य संस्थांची निवडणूक जवळ आली, तर सत्ताधारी इच्छुकांनी विकासकामांच्या जोरावर मते मागण्याची पध्दती आता बासनात गुंडाळली आहे. यापूर्वी विकासकामांच्या मुद्द्यावर होत असलेल्या निवडणुका आता मतदारांची हौस भागवून करण्याचा निर्धार काही इच्छुकांनी करून रणांगणात उतरणार असल्याचे मनसुबे आखले असून, मतदार देखील या प्रलोभनांना प्रभावित झाले आहेत.
हवेली तालुक्यात मोठे प्रश्न आजही भेडसावत आहे. निमशहरी असलेल्या भागांतही विजेचा खेळखंडोबा तसेच वाहतूक कोंडी, कचरा, स्वच्छतागृहे, दळणवळण तसेच आरोग्याची समस्या गंभीर आहे. परंतु, या समस्यांवर तोडगा काढण्याची मानसिकता तयारी केलेल्या इच्छुकांमध्ये नसून त्यांनी मतदारांची हौस भागवून निवडणूक लढविण्याची तयारी आखल्याने सामान्यांच्या मूळ प्रश्नांना कोणी वालीच नसल्याची स्थिती आहे.
हवेली तालुक्यात जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकीतील इच्छुकांचा तयारीचा आकडा कोट्यवधीत गेल्याने मतदार देखील निवडणुकीचा दृष्टिकोन हौस पुरी करून घेणे म्हणून गुंतल्याने तालुक्यात निवडणुका जवळ आल्या तरी विकासकामे व सामान्य प्रश्नांना बगल दिली जाते. आचारसंहितेपूर्वी निवडणुकीच्या विकासकामांच्या भूमिपूजनाची चाहूल आता संपली असून, सत्ताधारीच देवावर भरवसा दाखवून तयारीत उतरल्याने निवडणुकीत विकासात्मक मुद्द्याचा चुराडा झाला आहे.
जिल्हा परिषद व पंचायत समितीच्या सार्वत्रिक निवडणुकीत इच्छुकांची रणनीती पाहता दौरे, वाटप व इव्हेंट मॅनेजमेंट इतकीच तयारीची चर्चा तालुक्यात सुरू आहे. सर्व उमेदवार या आघाडीवर काम करीत आहेत. थेट मतदारांपर्यंत यंत्रणा राबवून निवडणुका जिंकणे, हाच इच्छुकांचा प्रयत्न आहे. स्थानिक नेतेमंडळींची आवश्यकता इच्छुकांना राहिली नसून थेट मतदारांपर्यंत पोहचून आपले ’बजेट’ वापरून बाजी मारण्याची व्यूहरचना आखली जात आहे.