Leadership conflict in Haveli
पुणे: कृषी उत्पन्न बाजार समितीच्या सभापतिपदाच्या निवडणुकीत भाजपचे रोहिदास उंद्रे आणि माजी सभापती प्रकाश जगताप यांच्यात जोरदार रस्सीखेच सुरू असताना एक नवा राजकीय टि्वस्ट निर्माण झाला आहे.
हवेलीतील थेऊर येथील यशवंत सहकारी साखर कारखान्यावर सुभाष जगताप हे चेअरमन आहेत, तर पुणे बाजार समितीसाठी त्यांचे सख्खे बंधू प्रकाश जगताप हे सभापतिपदासाठी तीव्र इच्छुक असल्याने हवेली तालुक्यातील महत्त्वाच्या दोन्ही संस्थांवर एकाच घरातील दोन्ही भाऊ कशासाठी? अशी विचारणा काही संचालकांनी भाजप आणि अजित पवार गटाच्या वरिष्ठांकडे केल्याचे समजते. (Latest Pune News)
बाजार समितीचे सभापती दिलीप काळभोर यांनी राजीनामा दिल्यामुळे सभापतिपदाची निवडणूक होत आहे. उपमुख्यमंत्री अजित पवार गटाचे संचालक कोणता निर्णय घेणार? याकडे आता लक्ष लागले आहे.
दोन व्यापारी मतदारसंघ संचालक व एक हमाल-मापाडी मतदारसंघाचे संचालक मिळून तिघांची भूमिका कोठे झुकते, यालाही महत्त्व आले आहे. दरम्यान, हवेली तालुक्यात नवाच ‘भाऊ-भाऊ’ मुद्दा चर्चेत आल्यामुळे या निवडणुकीकडे सर्वांचेच लक्ष लागले आहे.
राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटापेक्षा भाजपला या ठिकाणी संधी मिळावी, यासाठी मंत्रालयस्तरावरूनही जोरदार रस्सीखेच सुरू झाल्याचे समजते. पुणे बाजार समिती निवडणुकीत स्वतः मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनीही लक्ष घातल्याचे सांगण्यात येते.
त्यातच भाजपचे प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण हे गुरुवारी (दि. 16) पुणे दौर्यावर होते त्या वेळीदेखील हवेली तालुक्यातील भाजप पदाधिकार्यांनी त्यांना भेटून पुणे बाजार समितीच्या सभापतिपदी पक्षाच्याच उमेदवाराला संधी मिळण्यासाठी जोरदार फिल्डिंग लावल्याने शुक्रवारी(दि. 18) होणार्या सभापतिपदाकडे संपूर्ण हवेली तालुक्यातील कार्यकर्त्यांचे लक्ष लागले आहे. कारण बाजार समितीचा दुसरा सभापती भाजपचा करण्याचा वरिष्ठांचा दिलेला शब्द महायुतीचे घटक म्हणून मंत्रालय स्तरावरून सर्वमान्यता मिळून पाळला जाणार का? हीसुद्धा उत्सुकता आहे.
चौकशी सुरू झाल्यानंतर सचिवांना अनधिकृत गोष्टी कशा दिसल्या?
पुणे कृषी उत्पन्न बाजार समितीवर सहकार विभागाचे उपनिबंधक राजाराम धोंडकर हे सचिव म्हणून कार्यरत आहेत. त्यामुळे बाजार समितीची चौकशी सुरू झाल्यानंतर धोंडकर यांच्याकडून बाजारातील अनधिकृत गोष्टींवर कारवाई सुरू झालेली आहे.
मग चौकशीपूर्वी ही कारवाई करण्याकडे प्रशासनाचे प्रमुख म्हणून धोंडकर यांनी काणाडोळा का केला? चौकशी सुरू झाल्यावर कारवाईसाठी ते पुढे का सरसावले? अशी चर्चा सहकार आयुक्तालय व पणन संचालनालयात सुरू झाली आहे. त्यामुळे एकूणच सभापतिपदाच्या निवडणुकीनंतर प्रशासनही चौकशीच्या रडारवर येण्याची शक्यता असल्याचे सहकार व पणनच्या सूत्रांनी सांगितले.
चौकशी समितीसमोर बाजू मांडावी लागणार
दुसरीकडे बाजार समितीवरील अजित पवार गटाच्या संचालक आणि पदाधिकार्यांच्या विरोधात राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षाच्या खासदार सुप्रिया सुळे आणि विकास लवांडे यांनी पणन विभागाकडे विविध तक्रारी केल्या आहेत.
त्यामध्ये बाजार समितीच्या चौकशीसाठी नियुक्त केलेल्या अधिकार्यांवरच आक्षेप घेण्यात आल्याने ही चौकशी सध्या वादात सापडली आहे. त्यामुळे समितीच्या होणार्या नवीन सभापतीला पदाचा पदभार घेताच बाजार समितीमागे लागलेल्या चौकशीच्या ससेमिराला सामोरे जावे लागून त्यास सक्षमपणे बाजू चौकशी समितीसमोर मांडावी लागणार आहे.