Harshvardhan Sapkal criticizes BJP
खडकवासला: काँग्रेस पक्ष हा देशातील सर्वांत जुना व अनुभवी पक्ष असून, तो विचारधारेवर चालणारा पक्ष आहे. पक्षाकडे सक्षम व समर्थ नेतृत्व व कार्यकर्ते आहेत, तर भाजप दुसर्या पक्षातील कार्यकर्ते खाणारी चेटकीण आहे. मुख्यमंत्र्यांच्या आजूबाजूला व मंत्रिमंडळाकडे पाहिले तर काँग्रेसचेच लोक दिसतात.
एक कोटी सदस्य व मोदींसारखे नेतृत्व आहे म्हणतात, पण ते नेतृत्व सक्षम नसून पोकळ आहे; म्हणूनच त्यांना काँग्रेसच्या कार्यकर्त्यांना घ्यावे लागते, ही शोकांतिका आहे. काँग्रेसमुक्त भारत करण्याच्या नादात भाजपच काँग्रेसयुक्त झाला, असा घणाघाती हल्लाबोल महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी केला. (Latest Pune News)
खडकवासला येथे सोमवारी (दि. 11) काँग्रेसच्या नवनियुक्त पदाधिकार्यांच्या दोनदिवसीय निवासी कार्यशाळेचे उद्घाटन काँग्रेस प्रदेशाध्यक्ष सपकाळ यांच्या हस्ते झाले. या वेळी विधिमंडळ नेते विजय वडेट्टीवार, विधान परिषदेतील गटनेते सतेज ऊर्फ बंटी पाटील, काँग्रेस कार्य समितीचे सदस्य व माजी मंत्री बाळासाहेब थोरात, माजी मंत्री डॉ. विश्वजित कदम, अखिल भारतीय काँग्रेस कमिटीचे सचिव बी. एम. संदीप, कुणाल चौधरी, यूबी. व्यंकटेश, उपाध्यक्ष संघटन व प्रशासन अॅड. गणेश पाटील, वरिष्ठ प्रवक्ते अतुल लोंढे आदी उपस्थित होते.
या कार्यशाळेबद्दल प्रसार माध्यमांशी बोलताना काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ म्हणाले की, नवनियुक्त पदाधिकार्यांसाठी ही कार्यशाळा आयोजित करण्यात आलेली असून, प्रत्येक कार्यकर्ता प्रशिक्षित असावा हा त्यामागचा उद्देश आहे. यात orientation, introduction, आणि interaction ही त्रिसुत्री असणार आहे.
काँग्रेस विधिमंडळ पक्षनेते विजय वडेट्टीवार यावेळी म्हणाले की, आपल्या समोर आव्हाने खूप आहेत, काँग्रेसने सत्ता सर्वोच्च कधीच मानली नाही, दलित, आदिवासी, अल्पसंख्याक समाज घटकांना नजरेसमोर ठेवून काम केले पण भाजपा मात्र फक्त दोन उद्योगपतींसाठी सरकार चालवत आहे. राज्यात भाजपा युतीचे लुटेरे सरकार आहे. भाजपाकडे प्रचंड सत्ता, ईडी व सीबीआय आहे. प्रचंड लुट सुरू असून 40 टक्क्यांचे कमिशन लाटले जात आहे.
हर्षवर्धन सपकाळ यांची प्रदेशाध्यक्षपदी नियुक्ती होऊन सहा महिने झाले, या सहा महिन्यातील कार्य अहवाल प्रसिद्ध करण्यात आला. यावेळी अखिल भारतीय काँग्रेस कमिटीचे सचिव कुणाल चौधरी, माजी मंत्री डॉ. विश्वजित कदम यांनीही मार्गदर्शन केले. या कार्यशाळेत 300हून अधिक नवनियुक्त पदाधिकारी , माजी मंत्री, खासदार व आमदार सहभागी झाले आहेत. शिबिरात विविध चर्चासत्रे आयोजित करण्यात आली आहेत. उद्या महाराष्ट्र प्रभारी रमेश चेन्नीथला यांच्या मार्गदर्शनाखाली कार्यशाळेचा समारोप होणार आहे.
काँग्रेसला बलिदान व त्यागाचा इतिहास आहे, याचा आपल्याला अभिमान असला पाहिजे. काँग्रेस पक्षाने कठीण काळ पाहिलेला आहे व पराभवही पाहिलेला आहे. पण, यातूनही काँग्रेस पक्षाने उभारी घेतली व पुन्हा विजय संपादन केला. राज्यातील सरकारचा कारभार भयानक आहे, विधान भवनात घुसून मारहाण होते, कॅन्टीनमध्ये आमदार मारामारी करतो तर कोण गोळीबार करतो, भ्रष्टाचार बोकाळला आहे. पण, आपल्याला जनतेच्या जिव्हाळ्याचे प्रश्न हाती घ्यावे लागतील.- बाळासाहेब थोरात, माजी मंत्री व काँग्रेस कार्य समितीचे सदस्य