पुणे

हर्षवर्धन पाटलांकडून जातीयवादाची विषपेरणी : राज्यमंत्री दत्ता भरणे

अमृता चौगुले

पळसदेव : पुढारी वृत्तसेवा

एकोणीस वर्षे सत्तेत राहून, मुख्यमंत्र्यांच्या मांडीला माडी लावून बसूनही त्यांना कधी जनतेचा विकास करता आला नाही. सध्या त्यांना कोणतेही काम नसल्याने इंदापूर तालुक्यात जातीयवादाचे विष पेरण्याचे काम त्यांच्याकडून केले जात आहे. सांगलीचे खासदार संजय पाटील यांच्या लग्नसमारंभात थेट उपमुख्यमंत्री अजित पवार यांना तालुक्यात जातीयवाद चालल्याचे सांगून तालुक्यातील लोकांमध्येही गैरसमज निर्माण करून देण्याचा प्रयत्न करीत आहेत, असा आरोप राज्यमंत्री दत्तात्रय भरणे यांनी माजी सहकारमंत्री हर्षवर्धन पाटील यांच्यावर केला.

पळसदेव-बिजवडी जिल्हा परिषद गटातील सुमारे 97 कोटी 24 लाख रुपयांच्या विविध विकासकामांचे भूमिपूजन व उद्घाटन राज्यमंत्री भरणे यांच्या हस्ते झाले. या वेळी पळसदेव येथे आयोजित जाहीर सभेत ते बोलत होते. कार्यक्रमास जिल्हा परिषद सदस्य प्रवीण माने, माजी सदस्य प्रतापराव पाटील, राष्ट्रवादीचे तालुकाध्यक्ष हनुमंत कोकाटे, माजी अध्यक्ष महारुद्र पाटील, श्रीमंत ढोले, दीपक जाधव, मेघराज कुचेकर, हनुमंत बनसुडे, सरपंच इंद्रायणी सुजित मोरे, उपसरपंच सोनाली कुचेकर आदी उपस्थित होते.

उजनीत येणारे पुण्याचे सांडपाणी आपल्या इंदापूर तालुक्यातील शेतीला उपलब्ध करून देण्याता प्रयत्न केला, तर त्या योजनेला खीळ घालण्यासाठी सोलापूरकरांची डोकी भडकविण्याचा प्रयत्न केला जात आहे. त्यांना माहिती आहे, की जर तालुक्यातील पाणी प्रश्न कायमचा मिटवला, तर आपले राजकीय भवितव्य धोक्यात येईल. परंतु, तुम्ही कितीही प्रयत्न केले, तरी मामा जनतेचा विकास करण्यात कोठेही कमी पडणार नाही, असा टोलाही भरणे यांनी पाटील यांना लगावला.

पळसदेव बाजारपेठेतील रस्तारुंदीकरणात कोणावरही अन्याय न करता रस्त्याचे काम करण्याचे आश्वासन भरणे यांनी दिले. याशिवाय तालुक्यात रस्त्यांचे जाळे निर्माण होत असल्याने तालुक्यातील व्यापारपेठवाढीस त्याचा हातभार लागत आहे. यातून रोजगाराची संधी निर्माण होत आहे. मला मंत्रिपद मिळाले म्हणजे मी सत्तेचे ताम्रपट घेऊन आलेलो नाही, याची मला जाणीव असल्याने मिळालेल्या संधीचा जनसामान्यांसाठी उपयोग व्हावा,

यासाठी मिळेल त्या विभागातून निधी आणून विकासाचे काम केले जात असल्याचे स्पष्टीकरण त्यांनी दिले. या वेळी तालुका प्राथमिक शिक्षक सोसायटीच्या नूतन पदाधिकार्‍यांचा सत्कार राज्यमंत्री भरणे यांच्या हस्ते करण्यात आला. प्रवीण माने, महारुद्र पाटील, दीपक जाधव, मेघराज कुचेकर यांनी मनोगत व्यक्त केले. प्रास्ताविक नीलेश धापटे यांनी केले.

कार्यकर्त्यांची झाली चांगलीच गोची !

जिल्हा परिषद निवडणुकीत एकमेकांविरोधात लढलेले प्रवीण माने व दीपक जाधव या कार्यक्रमात एकाच व्यासपीठावर दिसून आले. दीपक जाधव यांनी नुकताच राष्ट्रवादीत प्रवेश केला. आम्ही 1998 पासून 2006 पर्यंत चांगले मित्र होतो. यापुढेही मैत्रीचे नाते कायम राहील, अशी ग्वाही माने व जाधव यांनी दिली. यामुळे निवडणुकीत एकमेकांच्या समर्थनार्थ प्रचाराचा धुरळा उडविणार्‍या कार्यकर्त्यांची या वेळी चांगलीच गोची झाली होती.

SCROLL FOR NEXT