पुणे: अक्षय तृतीयेनंतर दुसऱ्या टप्प्यात कच्च्या हापूस आंब्याची आवक वाढली असून, वाढत्या उष्णतेमुळे पिकण्याच्या प्रक्रियेला वेग आला आहे. त्यामुळे मागील पाच दिवसांत आंब्याच्या दरात निम्म्याने घसरण होऊन 1 हजार ते 1 हजार 500 रुपये डझन असलेला दर सध्या 500 ते 800 रुपयांवर आला आहे. वाढलेल्या पुरवठ्यामुळे आंबा सर्वसामान्यांच्या आवाक्यात आल्याची माहिती व्यापाऱ्यांनी दिली.
यंदा लहरी हवामानामुळे आंब्याच्या पहिल्या टप्प्यातील उत्पादनावर विपरीत परिणाम होऊन अपेक्षित आवक होताना दिसत नाही. त्यामुळे घाऊकसह किरकोळ बाजारात आंब्याचे दर चढेच होते. कोकणपट्ट्यातून पुणे कृषी उत्पन्न बाजार समितीच्या फळबाजारात दररोज जवळपास दहा हजार पेट्या, तर कर्नाटकातून दोन ते अडीच हजार पेट्यांमधून आंबा दाखल होत होता.
मात्र, अक्षय तृतीयेनंतर कोकणातील देवगड, संगमेश्वर, पावस, राजापूर, सावंतवाडी आदी भागांतून हापूस आंब्याची आवक दुपटीने वाढली आहे. त्यात उष्णतेमुळे परिपक्व होण्याची प्रक्रियाही वाढीला लागल्याने बाजारात आंबा मुबलक उपलब्ध असल्याने खरेदीदारांनीही हापूसच्या खरेदीस सुरुवात केल्याचे चित्र आहे.
कोकणातून मोठ्या प्रमाणात माल येत असून, वाढत्या उष्णतेमुळे आंबा लवकर पिकत आहे. त्यामुळे पुरवठा वाढल्याने दरात नैसर्गिक घट झाली आहे. गेल्या काही दिवसांत दर जवळपास निम्म्यावर आले आहेत. सध्या ग््रााहकांसाठी ही चांगली संधी असून, दर्जेदार हापूस परवडणाऱ्या दरात उपलब्ध होत आहे. पुढील काही दिवसांत आवक अशीच वाढत राहिल्यास दर आणखी स्थिर राहण्याची शक्यता आहे.युवराज काची, हापूस आंब्याचे व्यापारी, मार्केट यार्ड