वेल्हे: पानशेत, मुठासह सिंहगड खोर्यातील संततधारेने गेल्या 24 तासांत खडकवासला धरणसाखळीत अर्धा टीएमसीपेक्षा अधिक पाण्याची वाढ झाली. सोमवारी (दि. 16) पाच वाजेपर्यंत खडकवासला साखळीतील पाण्याची पातळी 5.77 टीएमसीवर म्हणजे 19.81 टक्क्यावर पोहचली होती, तर रविवारी (15) सकाळी सहा ते सोमवारी सायंकाळी पाच वाजेपर्यंतच्या 35 तासांत वरसगावात सर्वाधिक 123 मिलिमीटर पाऊस पडला, तर याच कालावधीत पानशेत येथे 112, टेमघर येथे 105 व खडकवासला येथे 60 मिलिमीटर पावसाची नोंद झाली. (Latest Pune News)
सोमवारी सकाळी जोरदार पाऊस पडल्यानंतर दिवसभर रिमझिम सुरू होती. सायंकाळी साडेपाचपासून पुन्हा पानशेत, वरसगाव, टेमघर धरणक्षेत्रात पावसाच्या सरी कोसळू लागल्या. त्यामुळे चारही धरण क्षेत्रातील ओढे, नाले, नद्या दुथडी भरून वाहू लागल्या. पावसाचा जोर कायम राहिल्यास मंगळवारी सकाळपर्यंत धरणसाठ्यात पुन्हा चांगली वाढ होण्याची शक्यता जलसंपदा विभागाने वर्तविली आहे.
तर खडकवासला 50 टक्के भरण्याची शक्यता
खडकवासला धरणाचे पाणलोट क्षेत्र सिंहगड खोर्यापासून पानशेत, वरसगाव व टेमघर धरणांच्या भिंतीपर्यंत पसरले आहे. खडकवासला धरण माथ्यावर पावसाचे प्रमाण कमी आहे. मात्र, धरण क्षेत्रात संततधार सुरू असल्याने खडकवासलाची पाणीपातळी सोमवारी सायंकाळी पाच वाजता 48.31 टक्क्यावर पोहचली.
त्यामुळे रात्रीपर्यंत धरण 50 टक्के भरण्याची शक्यता आहे. धरणसाखळीतील सर्वात मोठ्या वरसगावची पाणीपातळीही जवळपास 25 टक्क्यांवर पोहचली आहे. सायंकाळपर्यंत वरसगावमध्ये 24.16 टक्के, तर पानशेतमध्ये 15.49 व टेमघरमध्ये 1.97 टक्के साठा झाला होता.
धरणसाखळीत गतवर्षीपेक्षा दोन टीएमसी अधिक पाणीसाठा
रविवारी सायंकाळी पाच वाजता धरण साखळीत 5.20 टीएमसी पाणी होते. त्यात गेल्या 24 तासांत 0.57 टीएमसीची वाढ होऊन पाणीसाठा 5.77 टीएमसीवर गेला. रविवारी सकाळी सहापासून सोमवारी सकाळी सहापर्यंत टेमघर येथे 80, वरसगाव येथे 93, पानशेत येथे 93 व खडकवासला येथे 47 मिलिमीटर पाऊस पडला. गतवर्षीच्या तुलनेत धरणसाखळीत दोन टीएमसी अधिक पाणीसाठा आहे. गेल्या वर्षी आजच्या दिवशी 16 जून 2024 रोजी धरणसाखळीत 3. 80 टीएमसी पाणी होते.
जनजीवन विस्कळीत
पानशेत, वरसगाव धरण क्षेत्रात पावसाचा जोर अधिक आहे. जोरदार वार्यासह मुसळधार पाऊस कोसळत आहे. ओढे, नाले दुथडी भरून वाहत आहेत. त्यामुळे दापसरे, तव, धामण ओहोळ, ठाणगाव, माणगाव, साईव बुद्रुक, मोसे बुद्रुक आदी गावांतील जनजीवन विस्कळीत झाले आहे. दासवे येथील शेतकरी किरण कोंडिबा मरगळे म्हणाले, जोरदार वार्यासह पाऊस कोसळत आहे, त्यामुळे शेळ्या- मेंढ्या, गायीगुरांना रानात सोडता आले नाही.
खडकवासलाची पातळी 48 टक्क्यांवर आहे. पुणे शहर व परिसरासाठी 700 क्सूसेक पाणी सोडले जात असल्याने पाणीसाठ्यात मोठी वाढ झाली नाही. पावसामुळे पाण्याची आवक वाढली असली तरी धरणसाखळीतील धरणे रिकामी आहेत. त्यामुळे खडकवासला धरण शंभर टक्के भरल्यानंतर मुठा नदीच्या पात्रात पाणी सोडले जाणार आहे.-गिरीजा कल्याणकर, शाखा अभियंता, खडकवासला धरण.
संततधार पावसामुळे सोमवारी दिवसभरात पानशेत, वरसगावासह चारही धरणात पाण्याची आवक वाढली. धरणसाठ्यात मोठी वाढ झाली नाही. मात्र, पावसाचा जोर कायम राहिल्यास चार- पाच दिवसांत समाधानकारक पाणीसाठा होईल.अनुराग मारके, शाखा अभियंता, पानशेत धरण.