Death Pudhari
पुणे

Toxic Liquor Death: हडपसरमध्ये विषारी दारूचा आणखी एक बळी; राहुल क्षीरसागर यांचा मृत्यू

दारूच्या व्यसनामुळे कुटुंबाचा आधार हरपला; पांढरेमळा परिसरात हळहळ व्यक्त

पुढारी वृत्तसेवा

पुणे/हडपसर: पांढरेमळ्यात बुधवारी मध्यरात्रीनंतर दरवाजा हळूच उघडला... राहुल क्षीरसागर (वय 45, पांढरेमळा, हडपसर) पुन्हा एकदा दारूसाठी बाहेर पडला. घरापासून अवघ्या शंभर मीटरवर असलेल्या अड्ड्याकडे तो नेहमीप्रमाणे निघाला. पण, या वेळी ती वाट त्याच्या मृत्यूकडे घेऊन जाणारी ठरली.

राहुल आधीपासूनच आजारी होता. सतत पोटदुखीचा त्रास, अशक्तपणा आणि व्यसनामुळे खंगलेले शरीरः तरीही दारूची सवय सुटत नव्हती. पत्नी आणि दोन मुलांचा संसार त्याच्याकडे आशेने पाहत होता; पण व्यसनाने त्याला काही सुचत नव्हते.

गुरुवारी पहाटे दोनच्या सुमारास राहुल दारूच्या अड्ड्यावर गेला. तेथे दारू प्यायल्यानंतर अचानक त्याची प्रकृती बिघडली. काही वेळातच तो खाली कोसळला. आजूबाजूच्या लोकांनी त्याची अवस्था पाहून तातडीने जवळच्या रुग्णालयात हलवले.

दरम्यान, विश्रांतवाडीत राहणाऱ्या त्याच्या आईला फोन गेला. मुलाच्या प्रकृतीबाबत कळताच तिच्या पायाखालची जमीन सरकली. रुग्णालयात उपचार सुरू होते. पण विषारी दारूने शरीरात केलेला घात जीवघेणा ठरला. काही तासांतच राहुलचा मृत्यू झाला. ही बातमी परिसरात पसरताच पांढरे मळ्यात हळहळ व्यक्त होऊ लागली.

‌‘रात्रीपर्यंत दिसलेला माणूस सकाळी गेला,‌’ असे म्हणताना शेजाऱ्यांचाही गळा दाटून आला. कारण, राहुल फक्त व्यसनी नव्हता; तो दोन मुलांचा बाप होता, एका आईचा मुलगा होता आणि एका कुटुंबाचा आधार होता. सर्वात वेदनादायक क्षण होता तो त्याच्या पत्नीला फोन करून सांगण्याचा. ‌‘राहुल गेला...‌’ हे शब्द सांगताना नातेवाईकांनाही अश्रू आवरता आले नाहीत. घराजवळ सहज उपलब्ध होणारी दारू, व्यसनाच्या आहारी गेलेले पुरुष आणि उद्ध्वस्त होत जाणारी कुटुंबे. या सगळ्यात राहुल क्षीरसागर हे आणखी एक नाव समाविष्ट झाले.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT