Pune Encroachment Issue Pudhari
पुणे

Pune Encroachment Issue: हडपसर-मांजरी बैठकीत अतिक्रमण व होर्डिंगवरून प्रशासनाला जाब

नालेसफाई, अतिक्रमण व अनधिकृत होर्डिंगबाबत नागरिक आक्रमक; अधिकाऱ्यांकडून अपूर्ण उत्तरे

पुढारी वृत्तसेवा

हडपसर: हडपसर-मांजरी क्षेत्रीय कार्यालयात प्रभाग समितीची पहिली बैठक नुकतीच पार पडली. अनधिकृत होर्डिंग, अतिक्रमणे, नालेसफाईतील अनियमितता, सार्वजनिक स्वच्छतागृहांच्या साफसफाईकडे होणारे दुर्लक्ष, नियमबाह्य बदल्या आदी मुद्द्यांवर अधिकाऱ्यांना या वेळी नागरिकांनी जाब विचारला. अतिक्रमण कारवाईदरम्यान कोणत्याही नगरसेवकाने हस्तक्षेप करू नये, असा ठरावही या वेळी मंजूर करण्यात आला.

प्रभाग समिती अध्यक्ष तथा नगरसेवक प्रशांत तुपे यांच्या अध्यक्षतेखाली ही बैठक झाली. या वेळी प्रभाग क्रमांक 15, 16 आणि 17 मधील नगरसेवक, महापालिकेच्या विविध विभागांचे अधिकारी, हडपसर वाहतूक विभाग, हांडेवाडी वाहतूक विभाग, हडपसर पोलिस स्टेशन आणि काळेपडळ पोलिस ठाण्याचे अधिकारी, सामाजिक संस्थांचे प्रतिनिधी आणि नागरिक उपस्थित होते. वाहतुकीस अडथळा ठरणाऱ्या अतिक्रमणांवर कारवाई करण्याचे आदेश या वेळी सहायक आयुक्त रवी खंदारे यांनी दिले. अतिक्रमण कारवाईत कोणत्याही नगरसेवकाने हस्तक्षेप करू नये, असा ठरावही या बैठकीत मंजूर करण्यात आला.

सोलापूर रस्ता, हडपसर गावठाण, ससाणेनगर रस्ता, सासवड रस्ता, मुंढवा रस्ता तसेच साधना शाळा परिसरातील अतिक्रमणांचा मुद्दा बैठकीत उपस्थित करण्यात आला. नालेसफाई, झाडांच्या धोकादायक फांद्याची छाटणी आणि रस्ते दुरुस्तीची कामे आगामी पावसाळापूर्वी पूर्ण करण्याची मागणीही या वेळी करण्यात आली. नालेसफाईच्या कामाचा सविस्तर अहवाल देण्याची मागणीही या वेळी करण्यात आली.

सार्वजनिक स्वच्छतागृहांची साफसफाई नियमित होत नसतानाही दरमहा बिले काढली जात असल्याचा आरोपही या वेळी नागरिकांनी केला. संबंधित ठेकेदारावर कारवाई सुरू असल्याचे वरिष्ठ आरोग्य अधिकाऱ्यांनी सांगितले. घनकचरा विभागातील एका मुकादमाची झालेली नियमबाह्य बदली प्रकरणाची चौकशी करून दोषी अधिकाऱ्यांवर कारवाई करण्यात येईल, असे परिमंडळ उपायुक्त अरविंद माळी यांनी सांगितले.

अनधिकृत होर्डिंगची संख्याच माहीत नाही

प्रभाग समितीच्या बैठकीत अनधिकृत होर्डिंगबाबत चर्चा झाली. त्यावेळी आकाश चिन्ह विभागाकडे परिसरातील अनधिकृत होर्डिंगची संख्या किती? याबाबत माहितीच नसल्याचे स्पष्ट झाले. आतापर्यंत किती होर्डिंगवर कारवाई करण्यात आली, याचे समाधानकारक उत्तरही अधिकारी देऊ शकले नाहीत.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT