Accident Pudhari
पुणे

Hadapsar Accident: हडपसरमध्ये घसरगुंडी पडून चिमुरडीचा मृत्यू; सोसायटी पदाधिकाऱ्यांवर गुन्हा

मगरपट्टा परिसरातील दुर्दैवी घटना; निष्काळजीपणामुळे कारवाई, पोलिस तपास सुरू

पुढारी वृत्तसेवा

पुणे: सोसायटीच्या आवारात बसवलेली लोखंडी घसरगुंडी डोक्यात पडून एका बालिकेचा मृत्यू झाला. ही दुर्दैवी घटना हडपसरमधील मगरपट्टा भागातील वेदविहार सोसायटीत 7 एप्रिल रोजी दुपारी साडेबारा वाजण्याच्या सुमारास घडली.

अनिका नवनाथ देवीकर (वय साडेचार वर्षे) असे मृत्युमुखी पडलेल्या बालिकेचे नाव आहे. या दुर्घटनेस जबाबदार ठरल्याप्रकरणी हडपसर पोलिसांकडून सोसायटीतील चेअरमनसह अन्य पदाधिकाऱ्यांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला. याबाबत अनिकाचे वडील नवनाथ पांडुरंग देवीकर (वय 34, रा. वेदविहार सोसायटी, नोबल हॉस्पिटलजवळ, मगरपट्टा, हडपसर) यांनी फिर्याद दिली आहे.

पोलिसांच्या माहितीनुसार, 7 एप्रिल रोजी दुपारी साडेबाराच्या सुमारास अनिका सोसायटीच्या आवारात खेळत होती. सोसायटीकडून आवारात लहान मुलांसाठी खेळणी बसविण्यात आली आहे. सोसायटीच्या आवारातील लोखंडी घसरगुंडी पडल्याने अनिकाच्या डोके, चेहरा, मानेला गंभीर दुखापत झाली. बेशुद्धावस्थेतील अनिकाला खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले. उपचारादरम्यान तिचा मृत्यू झाला.

सोसायटीच्या आवारातील घसरगुंडी व्यवस्थित न ठेवता ती मोकळ्या जागेतील रस्त्याच्या कडेला ठेवली होती. ही घरसगुंडी काढून टाकण्याबाबत अनिकाचे वडील नवनाथ यांनी सोसायटीतील पदाधिकाऱ्यांना सांगितले होते. याबाबत वारंवार तक्रार दिली होती.

मात्र, सोसायटीतील पदाधिकाऱ्यांनी योग्य ती कार्यवाही न केल्याने दुर्घटना घडल्याचे अनिकाचे वडील नवनाथ देवीकर यांनी फिर्यादीत म्हटले आहे. त्यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार, सोसायटीतील पदाधिकाऱ्यांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सहायक पोलिस निरीक्षक साने तपास करत आहेत.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT