पुणे : सध्या शिक्षक विद्यार्थ्यांना ऑनलाइन पद्धतीनेही शिकवू लागले आहेत. शिक्षण हे कृत्रिम बुद्धिमत्तेच्या दिशेने जाऊन पोहचले आहे आणि आतातर मेंटॉरशिप ही संकल्पनाही उदयास आली आहे. हो, हा काळानुसार झालेला बदल आहे. पण, असे असले तरी आधुनिकतेच्या युगात प्राचीन काळापासून सुरू असलेली गुरुकुल पद्धतीच्या शिक्षणाची परंपरा टिकून आहे. पुण्यात अनेक कला संस्थांकडून गुरुकुल पद्धतीने शिक्षण दिले जात असून, गुरूंच्या सहवासात राहून अनेक शिष्य कला शिक्षण घेत आहेत. गायन, वाद्य, नृत्याचे धडे गुरुकुल पद्धतीने गिरवले जात असून, अनेक शिष्य गुरुकुल पद्धतीच्या शिक्षणाला महत्त्व देत आहेत. त्यामुळेच पुण्यामध्ये गुरू-शिष्य परंपरेचा धागा आजही टिकून आहे.
आत्ताच्या घडीला पुण्यात अंदाजे 15 ते 20 संस्थांचे, गुरूंचे गुरुकुल असून, गुरूंकडून ज्ञानप्राप्ती करून अनेक कलाकार घडत आहेत. गुरूंचे शिष्यांच्या आयुष्यातील स्थान मोठे असून, गुरुवारी (दि. 10 जुलै) साजर्या होणार्या गुरुपौर्णिमेनिमित्त दै. ‘पुढारी’ने गुरू-शिष्य परंपरेबद्दलचा आढावा घेतला.
तालयोगी आश्रमाचे तालयोगी पंडित सुरेश तळवलकर म्हणाले, गुरू नुसते शिष्याला शिकवत नाहीत, गुरू त्यांना कलेतील शास्त्र, भूमिका सांगतात, त्यातील तंत्र शिकवतात, स्वत:कडील ज्ञान शिष्याला देतात आणि शिष्याला संस्कारित करतात. अशा पद्धतीने गुरू शिष्याला घडवतात. गुरू-शिष्यपरंपरेत जोपर्यंत शिष्य पूर्णपणे घडत नाही तोपर्यंत गुरूंचे शिष्यांना ज्ञान देणे कधीच पूर्ण होत नाही, त्यामुळे आपल्याकडे गुरू-शिष्य परंपरेला महत्त्व आहे आणि ही परंपरा टिकून आहे.
आमच्या गुरुकुलात 30 शिष्य राहून गुरूंकडून संगीत शिक्षण घेत आहेत. आमच्याकडे शिकणारा विद्यार्थी म्हणून येतो. गुरूंच्या शिक्षण घेण्यासाठी तो शिष्य बनतो, पुढे शिष्याचा कलाकार होतो, कलाकाराचा शिक्षक बनतो आणि शिष्याचा तो गुरू कसा होईल, याला आम्ही महत्त्व देतो. आज माझे काही शिष्य गुरुस्थानी आहेत, त्यांचेही खूप शिष्य आहेत. विद्यार्थी, शिष्य, कलाकार, शिक्षक, गुरू आणि आचार्य या गुरुकुल पद्धतीच्या शिक्षणाची परंपरा आहे.
गुरूंचे शिक्षणाला घडविणे आत्ताही महत्त्व ठेवते. त्यामुळे आधुनिक क्लासरूम शिक्षणात कलाकार घडणे शक्य नाही, तो गुरुकुल पद्धतीनेच घडू शकतो.
संगीतकार, गायक पंडित हेमंत पेंडसे यांच्या शिष्य परिवाराच्या वतीने गुरुपौर्णमिेनिमित्त रविवारी (दि.13 जुलै) प्रातःकालीन रागांच्या संगीत मैफलीचे आयोजन केले आहे. ही मैफल सकाळी नऊ वाजता वारजे येथील ओव्हल नेस्ट सोसायटीच्या सभागृहात होणार आहे. या कार्यक्रमात पं. हेमंत पेंडसे यांच्यासह अनुराधा लेले, संदीप देशमुख, राधिका ताम्हनकर यांचे गायन होणार आहे. अभिजित बारटक्के, आदिती गराडे हे साथसंगत करणार आहेत.
संगीत, नृत्य अन् इतर कलांचे शिक्षण घेण्यासाठी प्राचीन काळापासून चालत आलेली परंपरा म्हणजे गुरू-शिष्य परंपरा. भारताला प्रगल्भ अशी गुरू-शिष्य परंपरा लाभली असून, गुरुकुल हे असे ठिकाण असते जिथे शिष्य दीर्घकाळ वास्तव्यास असतात. गुरूंच्या सहवासात राहून ते गुरूंकडून आपल्या आवडत्या कलेत सखोल ज्ञान मिळवतात. गुरुकुलात शिष्याच्या राहण्याची, जेवणाची आणि शिक्षणाची व्यवस्था असते.
आमच्याकडे आजही गुरुकुल पद्धतीने शिष्य घडविले जात आहेत. पूर्णवेळ संगीताचे शिक्षण घेण्यासाठी इच्छुक असणारे विद्यार्थी पुण्यात येऊन गुरुकुल पद्धतीने शिक्षण घेतात. सध्या 13 शिष्य तबला, संवादिनी, नृत्य आणि गायनाचे शिक्षण घेत आहेत. मोठा काळ गुरूंचा सहवास लाभल्याने संगीतासह शिष्यांना इतर कला माध्यमांचे ज्ञान प्राप्त होते. म्हणूनच, पुण्यामध्ये अनेक संस्थांकडून गुरुकुल पद्धतीने शिक्षण दिले जात आहे.- पंडित प्रमोद मराठे, प्राचार्य, गांधर्व महाविद्यालय