पुणे : अधिक श्रावण मासानंतरच्या श्रावणाची लोक आतुरतेने वाट पाहत आहेत. श्रावणात होणार्या धार्मिक कार्यक्रमांसाठी तयारीला आतापासूनच सुरुवात झाली आहे. 17 ऑगस्टपासून श्रावणाला सुरुवात होत असून लघुरुद्र, सत्यनारायण पूजा, वास्तुशांती, असे विविध धार्मिक कार्यक्रम-पूजा या महिन्यात होणार आहेत. यासाठी गुरुजींकडे पंधरा दिवसांआधीच विचारणा सुरू झाली असून, कार्यक्रमांसाठी गुरुजींकडे दूरध्वनीद्वारे वेळाही निश्चित करण्यात येत आहेत. पुण्यातील गुरुजींकडे मुंबई, सातारा, सांगली, कोल्हापूर आदी जिल्ह्यांतूनही; तर अमेरिका, कॅनडा, ऑस्ट्रेलिया आदी देशांमध्ये राहणार्या मराठीभाषकांकडूनही ऑनलाइन पूजेसाठी वेळा निश्चित करण्यात आल्या आहेत.
अधिक श्रावण मास 16 ऑगस्टला संपणार आहे, तर त्यानंतर 17 ऑगस्टपासून श्रावणाला सुरुवात होत आहे. हा महिना सण-उत्सवांचा आणि धार्मिक कार्यक्रमांचा मानला जातो. काहीज ण नव्या घरी गृहप्रवेश करतात, तर काही जण नवीन व्यवसायाचे निमित्त साधून सत्यनारायण पूजा करतात. यंदाही लघुरुद्रापासून ते सत्यनारायण पूजेपर्यंत धार्मिक कार्यक्रम होतील.
पुण्यातील गुरुजी ऑफलाइन-ऑनलाइन पद्धतीने हे कार्यक्रम करणार असून, देशविदेशातून यंदा गुरुजींकडे त्यासाठी विचारणा होत आहे. श्रावण महिन्यातील धार्मिक कार्यक्रमांसाठी पाहुण्यांच्या आणि नातेवाइकांच्या वेळा निश्चित करूनच गुरुजींचीही वेळ ठरवली जाते. त्यामुळे लोक महिनाभरापूर्वीच त्यासाठीची वेळ ठरवून गुरुजींना कार्यक्रमांसाठी निमंत्रित करीत आहेत. तसेच, यामुळेच श्रावणातील प्रत्येक दिवशीचे गुरुजींचे वेळापत्रक आतापासून ठरले आहे.
धार्मिक कार्यक्रमांसाठीची तारीख आणि वेळ ठरल्यानंतर गुरुजींकडे पंधरा दिवसांपूर्वीच विचारणा सुरू होते. यंदाही लोक आगाऊ वेळनिश्चितीवर भर देत असून, आमचे धार्मिक कार्यक्रमांसाठीचे वेळापत्रक आतापासून निश्चित झाले आहे. लघुरुद्र, सत्यनारायण पूजा, वास्तुशांती पूजनसाठीचे अनेक मुहूर्त या महिन्यात आहेत. आमच्याकडे विविध जिल्ह्यांमधून विचारणा होत आहे.
हेही वाचा