पुणे

गुंजवणी धरणग्रस्तांना कुणी वालीच नाही; भूखंडासाठी सरकारदरबारी हेलपाटे

Laxman Dhenge

वेल्हे : पुढारी वृत्तसेवा : गुंजवणी धरणाचे शंभर टक्के काम पूर्ण होऊनही वेल्हे तालुक्यातील शंभरहून अधिक धरणग्रस्तांचे पुनर्वसनाअभावी हाल सुरू असल्याने गंभीर वास्तव्य पुढे आले आहे. भूखंड मिळावा, यासाठी बाधितांचे शासनदरबारी हेलपाटे सुरू आहेत. त्यामुळे या धरणग्रस्तांचे लवकरात लवकर पुनर्वसन करून त्यांना सर्व सोयीसुविधा पुरविण्याची मागणी जोर धरू लागली आहे.
गुंजवणी धरणात कोदापूर, निवी, कानंद, घेवंडे आदी गावांतील शिवकाळपासून वहिवाटीची शेतीवाडी, घरे बुडाली. या धरणग्रस्तांचे पुनर्वसन न करताच धरणात शंभर टक्के पाणी अडविण्यात आले.

त्यामुळे घेवंडे व परिसरातील रस्ते पाण्यात बुडाले आहेत. अद्यापही या गावात जाण्यासाठी बारमाही रस्ते नाहीत. धरण भरल्यानंतर विद्यार्थी, शेतकर्‍यांना मृत्यूशी झुंज द्यावी लागत आहे. पन्नासहून अधिक धरणग्रस्तांना अद्यापही घरासाठी भूखंड मिळालेला नाही, तर शंभरहून अधिक शेतकर्‍यांना पुनर्वसनाची जमीन मिळालेली नाही. शिवाजी धोंडिबा निगडे, गेनबा ज्ञानोबा भोसले आदी धरणग्रस्त भूखंडासाठी याचना करीत आहेत.

गुंजवणी धरणतीरावर कोदापूर, भोसलेवाडी येथील धरणग्रस्तांना राहण्यासाठी भूखंड देण्यात आले. तेथे 250 धरणग्रस्त राहत आहेत. अद्यापही पन्नासहून अधिक धरणग्रस्तांना राहण्यासाठी भूखंड देण्यात आले नाही. पुनवर्सन वसाहतीला गावठाण, महसुली गावचा दर्जा दिलेला नाही. डांबरी रस्ते नाहीत. पाण्याचा खर्च आम्ही वर्गणी काढून करीत आहोत. अनेक हलाखीला तोंड द्यावे लागत आहे.

भीमाजी देवगिरकर, निमंत्रक, गुंजवणी धरणग्रस्त कृती समिती

गुंजवणी धरण परिसरात निवासी भूखंडासाठी जागा नाही तसेच धरणग्रस्तांना पुनर्वसनाची जमीन देण्यासाठी भोर व वेल्हे तालुक्यात जमीन उपलब्ध नाही. त्यामुळे पुरंदर तालुक्यातील गायरान जमीन गुंजवणी धरणग्रस्तांना देण्यात यावी, यासाठी वरिष्ठपातळीवर कार्यवाही सुरू आहे.

नयन गिरमे, सहायक अभियंता, गुंजवणी धरण प्रकल्प

हेही वाचा

SCROLL FOR NEXT